औसा / उजनी : राज्यातील शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी होईपर्यंत सरकारच्या विरोधातील आमचा हा संघर्ष लढा सुरूच राहणार आहे. कर्जमाफी होईपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी रविवारी येथे केले.शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरून काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्व विरोधी पक्षांनी काढलेली संघर्ष यात्रा रविवारी सकाळी औसा तालुक्यात पोहोचली. बुधोडा, औसा मोड, बोरफळ, बेलकुुंड मार्गे ही संघर्ष यात्रा उजनी येथे पोहोचल्यानंतर तिथे जाहीर सभा झाली. यावेळी ते बोलत होते. संघर्ष यात्रेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, समाजवादी पक्षाचे आ. अबू आझमी, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जितेंद्र आव्हाड, आ. त्रिंबक भिसे, आ. विक्रम काळे, आ. बसवराज पाटील, आ. सुनील केदार, आ. राहुल बोंद्रे, आ. जयकुमार गोरे, आ. विद्या चव्हाण, आ. मुस्तबानो खलिपे, आ. संग्राम थोपटे, आ. दीपक चव्हाण, आ. अहिरे, आ. नरहरी जिरवळ, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, धीरज देशमुख, माजी आ. बाबासाहेब पाटील यांच्यासह लातूर जिल्हा बँकेचे चेअरमन श्रीपती काकडे, नगराध्यक्ष अफसर शेख, उपाध्यक्ष भरत सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, संजय बनसोडे, रामदास चव्हाण, नारायण लोखंडे आदींची उपस्थिती होती. खा. अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या झालेल्या अवस्थेला वाचा फोडण्यासाठी ही संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. विरोधी पक्ष शेतकऱ्यांसाठी आवाज उठवीत आहेत. पण हा आवाज कोंडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाजपा सरकार असंवेदनशील आहे. खोटी आश्वासने देऊन भाजपा सत्तेवर आले आहे. ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करून भाजपा निवडणुका जिंकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. १५ दिवसांपूर्वी या भागात गारपीट व अवकाळी पाऊस झाला. त्याचे पंचनामे अद्याप झाले नाहीत. मदत तर दूरच, असेही खा. अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले.
कर्जमाफीसाठी आमचा संघर्ष लढा
By admin | Updated: April 2, 2017 23:46 IST