औरंगाबाद : जात-पात, धर्म आणि संभाजीनगर हे मुद्दे सोडून विकासाच्या मुद्द्यावर भाजप, शिवसेना व एमआयएमने मनपा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान गुरुवारी येथे समाजवादी पार्टीने पत्रपरिषदेद्वारे देण्यात आले.
समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष फैसलखान यांनी यावेळी मनपा प्रशासक डॉ. आस्तिक कुमार पांडेय यांच्यावर गंभीर आरोप केले.
पुणे शहरालाच संभाजीनगर हे नाव देणे यथोचित ठरेल. कारण त्यांचा कार्यकाळ पुणे भागातच गेला आहे असे सांगून फैसलखान यांनी स्पष्ट केले की, औरंगजेबाचे मूळ नाव अबुल मुजफ्फर मोहियोद्दीन म़ोहंमद असे होते. औरंगाबादमध्ये हे नाव कुठे दिसते का? औरंग याचा अर्थ अनेक रंग. जेब म्हणजे चांगले दिसणे. हे नाव तत्कालीन ब्राम्हण समाजाने दिले, याबाबत प्रदेश महासचिव अब्दुल रऊफ यांनी स्पष्ट केले. कटकट दरवाजा वाचवायचा असेल, तर दोन्ही बाजूंचे पूल तोडण्याची मागणी यावेळी करण्यात आली. मनपाने सुरू केलेल्या सायकल ट्रॅकला समाजवादी पार्टीने विरोध केला. हा पैसा झोपडपट्ट्यांच्या विकासावर खर्च करता आला नसता का? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
शेख अकील, सिद्दीक खान, प्रकाश पट्टेदार, अय्यूबखान, डॉ शरीफ आदींची पत्रपरिषदेस उपस्थिती होती.