लातूर : सामाजिक न्याय विभागाच्या वतीने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती वर्षभरापासून अजूनही लटकलेलीच आहे. लातूर जिल्ह्यातील तब्बल साडेतीन हजार विद्यार्थी या शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. परंतु, महाविद्यालयांनीच त्यांचा प्रस्ताव पाठविला नसल्याचा ठपका ठेवून समाजकल्याण विभागाने आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिला आहे. राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी २ आॅक्टोबर २०१० पासून ई-स्कॉलरशीप योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात तर शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर शुल्क संबंधित महाविद्यालयांच्या खात्यात जमा होते. परंतु, त्यासाठी आॅनलाईन आवेदनपत्र भरण्याची अट आहे. दरम्यान, २०१३-१४ या शैक्षणिक वर्षात लातूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरले. दरम्यान, त्यापैकी ३५०२ विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालयाच्या स्तरावरून समाजकल्याण कार्यालयास फॉरवर्ड केला नसल्यामुळे हे विद्यार्थी अजूनही शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत. शिवाय, ३९ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जिल्हास्तरावरून प्रलंबित राहिली आहे. लातूरसोबतच उस्मानाबाद जिल्ह्यातील ६८७, नांदेड ४३५३ तर हिंगोली जिल्ह्यातील २३८ विद्यार्थ्यांना महाविद्यालय व जिल्हास्तरावरील यंत्रणेचा फटका बसला आहे. (प्रतिनिधी)तातडीने आॅनलाईन अर्ज पाठवा...या प्रलंबित विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज तातडीने २० जूनपर्यंत समाजकल्याण आयुक्तांकडे फॉरवर्ड करण्याची सूचना या विभागाने केली आहे. याऊपरही यात विलंब होऊन विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय व प्राचार्यांची राहील, असे सुचित करून गुन्हे दाखल करण्याचा इशारा समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्तांनी दिला आहे.
साडेतीन हजार विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडकली !
By admin | Updated: June 20, 2014 00:46 IST