उमरगा : शहरातील इंदिरा गांधी झोपडपट्टी येथे शौचालयाची उभारणी करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारी येथील महिलांनी पालिकेच्या मुख्याध्याधिकाऱ्यांना घेराव घालून शौचालये उभारण्याची मागणी केली.राष्ट्रीय महामार्गालगत काळा हनुमान मंदिराशेजारी गेल्या पंचवीस वर्षांपासून इंदिरा आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १५२ घरकुले बांधून देण्यात आली आहेत. २५ वर्षांच्या संघर्षानंतर पालिकेच्या वतीने झोपडपट्टीतील रहिवाशांना मालकी हक्क देण्यात आले आहेत. या झोपडपट्टी भागात पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, पथदिवे इत्यादी मुलभूत सुविधांसाठी नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करावा लागत आहे. तसेच शौचालयाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या असुविधेअभावी विशेषत: महिलांची कुचंबना होत आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन सुविधा पुरविण्यात असमर्थ ठरत असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. संतोष ढेंगळे यांना कार्यालय त्यांना घेराव घातला. महिलांनी त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, काशिनाथ राठोड यांचीही उपस्थिती होती. (वार्ताहर)संतप्त महिलांनी मुख्याधिकारी संतोष ढेंगळे यांना आपल्या एकमेव प्रश्नाची मागणी केली. तेव्हा याप्रकरणी येथे शौचालये उभारायचे कसे? कुणाच्या जागेत उभारायचे? असा सवाल महिलांना करुन ‘तुम्ही जागा दाखवा, तात्काळ शौचालये बांधकाम हाती घेवू’ असे आश्वासन दिले. यावेळी रज्जाक अत्ता यांनी सुचविल्याप्रमाणे या भागात खुल्या व बिगर वापराच्या जागेचे मोजमाप करुन शासकीय मान्यता येईपर्यंत तात्पुरते शौचालये उभारण्यासाठी चर्चा झाल्यानंतर महिला व माजी नगराध्यक्ष रज्जाक अत्तार, मुख्याधिकारी यांच्यातील निर्माण झालेला तणाव कमी झाला.
संतप्त महिलांनी घातला मुख्याधिकाऱ्यांना घेराव
By admin | Updated: August 13, 2014 00:53 IST