लातूर : लातूरच्या आगारप्रमुख म्हणून महिला अधिकारी रूजू झाल्या़ महिला अधिकारी रूजू झाल्यामुळे आपसुकच महिला कर्मचाऱ्यांमध्ये आपल्याला आता न्याय मिळेल, अशी भावना होती़ परंतू, काही कालावधीतच महिला वाहकांच्या तक्रारी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे समोर आले आहे़ दरम्यान, एका महिला वाहकाला प्रसुती रजेपासून आगारप्रमुख दूर ठेवत असल्याने त्यांनी न्यायासाठी विभागीय कामगार अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे़लातूरच्या आगारप्रमुख म्हणून धरणी कांडगिरे या रूजू झाल्यापासून लातूर आगाराला ग्रहण लागल्याचे दिसत आहे़ त्या रूजू होताच मासिक, त्रैमासिक पासचा अपहार उघड झाला़ त्यातही तीन अधिकाऱ्यावर कारवाई झाली तर एक अधिकारी प्रतिक्षेत आहे़ दरम्यान, महिलांच्या प्रसुती रजेसाठी आडवणूक केल्याचा प्रकारही समोर आला आहे़ लातूर आगारातील वाहक म्हणून एसक़े़ मडके या सेवेत आहेत़ त्यांनी सात महिन्याच्या गरोदरपणाच्या कालावधीत त्रास होत असल्याने २० जून रोजी पतीला पाठवून रजेचा अर्ज दिला़ तोही अर्ज आगारप्रमुखांनी नाकारला़ त्यानंतर पुन्हा पोस्टाने २२ जून रोजी अर्ज पाठविला़ तोही नामंजूर करण्यात आला़ त्यानंतर पुन्हा २७ जूनला स्वत: रजेचा अर्ज घेऊन आगारप्रमुख धरणी कांडगिरे यांना भेटल्या़ त्यानंतरही त्यांनी रजा मान्य न करता गैरहजरी दाखविली़ त्यामुळे त्यांनी न्यायासाठी विभागीय कामगार अधिकारी घाटगे यांच्याकडे अर्ज दिला आहे़ (प्रतिनिधी)
महिला अधिकाऱ्यांकडूनही प्रसुती रजा मिळेनां
By admin | Updated: July 4, 2016 00:28 IST