औरंगाबाद : रिमांड होममध्ये दाखल असलेल्या मुलाच्या जामिनासाठी आवश्यक असलेला गृहचौकशी अहवाल बाल कोर्टात पाठविण्यासाठी तक्रारदार मातेकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना महिला व बालविकास विभागाच्या परीविक्षा अधिकारी शैला सुरेश जंगम (५२, रा. सिंधी कॉलनी) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास खोकडपुरा येथील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात करण्यात आली.पोलीस उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी यांनी सांगितले की, तक्रारदार महिलेच्या मुलावर मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे सदर मुलास बाल कोर्टाच्या आदेशाने रिमांड होम येथे दाखल केलेले आहे. आपल्या मुलास जामीन मिळावा, यासाठी तक्रारदार महिलेने बाल न्यायालयात वकिलामार्फत अर्ज केला आहे. न्यायालयाने जिल्हा परीविक्षा अधिकाऱ्यास मुलाच्या घरी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. शैला जंगम यांनी महिलेचे घर बघून चौकशी अहवाल कोर्टात पाठविण्यासाठी चार हजार रुपये लाच मागितली. तक्रारदार महिलेने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. पोलीस अधीक्षक डॉ.एस.डी.स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक प्रकाश कुलकर्णी, रामनाथ चोपडे, पोलीस निरीक्षक वैशाली पवार यांनी हा सापळा रचला. या सापळ्यासाठी कर्मचारी गणेश पंडुरे, अजय आवले, अश्वलिंग होनराव, सचिन शिंदे, मीरा सांगळे, चालक नितीन गायकवाड यांनी त्यांना मदत केली. क्रांतीचौक पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
महिला अधिकारी लाच घेताना अटकेत
By admin | Updated: March 28, 2015 00:47 IST