संतोष हिरेमठ
औरंगाबाद : राष्ट्रीय आरोग्य अभियानातर्फे घाटी रुग्णालयात २०० खाटांचा स्वतंत्र माता व बालसंगोपन (एमसीएच विंग) विभाग उभारण्यास मंजुरी देण्यात आली होती. मात्र, दूध डेअरी येथे २०० खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय उभारण्यात येणार असल्याने घाटीतील एमसीएच विंग रद्द करण्यात आले. प्रस्तावित महिला रुग्णालयातच एमसीएच होणार असल्याचा दावा केला जात आहे; पण तरीही औरंगाबादेतील मंजूर २०० खाटा जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
औरंगाबादेत अनेक वर्षांच्या शोधानंतर २०० खाटांच्या महिला व नवजात शिशू रुग्णालयासाठी दूध डेअरी येथील जागा मिळाली. १११ कोटी ८९ लाखांतून हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. दुसरीकडे २०८-१९ मध्ये घाटीत एमसीएच विंगसाठी ३८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे शहरात ४०० खाटांची भर पडणार असल्याने रुग्णसेवेत वाढ होण्याची स्थिती होती; परंतु घाटीतील एमसीएच विंग रद्द करण्यात आले आहे. हे एमसीएच विंग दूध डेअरी येथील जागेतच होईल, असे सांगितले जात आहे.
----
एमसीएच विंग का गरजेचे?
घाटीत प्रसूतींची संख्या दररोज सुमारे ५० ते ६० एवढी असून, वर्षभरात १८ हजारांहून अधिक नॉर्मल प्रसूती आणि ४ हजारांपर्यंत सिझेरियन प्रसूती होतात. प्रसूतीनंतर त्यातील जवळपास ३ हजार किंवा त्यापेक्षा अधिक बालके विविध कारणांमुळे नवजात शिशू विभागात दाखल होतात. त्यामुळे एका वॉर्डात माता, तर दुसऱ्या वॉर्डात बाळावर उपचार करावे लागतात. त्यामुळे या ठिकाणी २०० खाटांच्या नव्या एमसीएच विंगच्या माध्यमातून माता व नवजात शिशूंवर एकाच छताखाली उपचार करण्याची योजना आखण्यात आली होती.
------
घाटीत एमसीएच विंग होणार नाही
एमसीएच विंग घाटी रुग्णालयात होणार नाही. दूध डेअरी येथे पाच मजली महिला रुग्णालय व नवजात शिशू रुग्णालय होणार आहे. याच ठिकाणी २०० खाटांचे महिला रुग्णालय राहील आणि २०० खाटांचे एमसीएच विंग राहील. खालच्या मजल्यात ओपीडी राहील. महिला रुग्णालयासाठी २ मजले, तर एमसीएच विंगसाठी २ मजले राहतील.
- डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक
--
घाटीत होणे आवश्यक
घाटीत एमसीएच विंगसाठी जागाही निश्चित झाली होती; परंतु ते रद्द करण्यात आले. घाटीत बाळ आणि मातांसाठी जमिनीवर उपचार घेण्यासाठीही जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे एमसीएच विंग घाटीत होणे गरजेचे होते. दूध डेअरी येथील जागेत होईल; पण ती संदर्भित सेवा (रेफर) सुरू झाली, असे होऊ नये.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभागप्रमुख, घाटी
---
स्वतंत्र उभारणी व्हावी
दोन वेगवेगळ्या बाबी एकत्र होता कामा नये. पुढे एमसीएच विंग रद्द होण्याची शक्यता नाकारताही येत नाही. दोघांचे बजेटहेडही वेगळे आहे. त्यामुळे दोन वेगवेगळी रुग्णालये झाली पाहिजे. महिला रुग्णालय स्वतंत्र असणे गरजेचे आहे.
- डाॅ. अशोक बेलखोडे, माजी सदस्य, मराठवाडा विकास मंडळ तथा माजी अध्यक्ष-आरोग्य समिती
-----
फोटो ओळ
घाटीत प्रस्तावित करण्यात आलेल्या एमसीएच विंगचे संकल्प चित्र.