औरंगाबाद : महापालिका आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या ‘जलश्री’ या निवासस्थानी नगरसेवक, पदाधिकारी, कंत्राटदार, बिल्डरांनी मंगळवारी गर्दी केली होती. मागील १९ महिन्यांपासून तुंबलेल्या अनेक संचिका मंजूर करून घेण्यासाठी सर्वांनी आयुक्तांपुढे अखेरचा दंडवत घातला. जाता-जाता कशाला नाराजी म्हणून आयुक्तांनीही काही संचिकांवर आपल्या हस्ताक्षराची मोहोर उमटवली.इच्छुक अधिकाऱ्यांनी पदोन्नतीसाठी आयुक्तांकडे फिल्डिंग लावण्यासाठी काही नगरसेवकांना सुपारी देऊन टाकली. भोगवटा कक्षप्रमुख हे पद २०११ साली तात्पुरत्या स्वरूपात अस्तित्वात आले होते. ते पद मंजूर करून त्यावर अधिकाऱ्याला बसविण्यासाठी नगरसेवक आयुक्तांच्या निवासस्थानी होते.अधिकाऱ्यांच्या लॉबीने आस्थापना विभागाला हाताशी धरून पदोन्नतीसाठी जुलै महिन्यातच मर्जीनुसार सीआर तयार करून घेतले आहेत. सर्व विभागातील बहुतांश अभियंते व अधिकाऱ्यांनी पदोन्नतीच्या अनुषंगाने आयुक्तांना साकडे घातले. आयुक्तांनी कुणाच्याही मागणीला दाद दिली नाही. दरम्यान, आयुक्त डॉ. कांबळे म्हणाले, प्रलंबित संचिकांबाबत निर्णय घेतला, मात्र कोणत्याही बेकायदेशीर संचिकेला मंजुरी दिलेली नाही. माजी विरोधी पक्षनेते डॉ. जफर खान यांनी आरोप केला की, ही मनमानी सुरू आहे. बदली झाल्यानंतर कुठल्याही संचिकांवर अधिकाऱ्यांना मागच्या तारखेमध्ये स्वाक्षरी करता येत नाही. मात्र सह्यांसाठी आयुक्तांच्या बंगल्यावर अनेकांची गर्दी असल्याचे दिसले.
तुंबलेल्या संचिकांचे भाग्य फळफळले
By admin | Updated: September 3, 2014 00:06 IST