औरंगाबाद : जिल्ह्यातील ५७९ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी जिल्ह्यात २२६८ मतदान केंद्रांवर मतदान झाले. या निवडणुकीत ८० टक्के विक्रमी मतदान झाले असून १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक मैदानात होते. त्यांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले आहे.
सकाळी ७.३० वा मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी ५.३० वा. मतदान प्रक्रिया सुरू राहिली. एकूण ६१७ पैकी ३२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर ६ ठिकाणी मतदान घेतले नाही. ६१७ पैकी ५७९ ग्रामपंचायतींमधील ४ हजार ६९९ सदस्य निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी ११ हजार ४९९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. ५ लाख ५१ हजार ८२२ महिला, तर ६ लाख ४ हजार ८०४ पुरुष अशा एकूण ११ लाख ५६ हजार ६२६ पैकी ९ लाख २५ हजार ३०० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गंगापूर तालुक्यातील उत्तरवाडी येथील तांदुळवाडी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मतदारांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. विकासकामे होत नसल्यामुळे मतदारांनी बहिष्कार टाकला. त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला; परंतु त्याने काही फरक पडला नाही. एवढा प्रकार वगळता जिल्ह्यात कुठेही गैरप्रकार घडला नसून शांततेत मतदान प्रक्रिया पार पडल्याचा दावा करीत साधारणत: ८० टक्के मतदान झाल्याचे उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी सांगितले.
मतदानाचा टक्का असा वाढत गेला
सकाळी ७.३० ते ९.३० दरम्यान १०.८१ टक्के मतदान झाले.
सकाळी ९.३० ते १.३० दरम्यान ४९.१३ टक्के मतदान झाले.
दुपारी १.३० ते ३.३० दरम्यान ६७.३१ टक्के मतदान झाले.
दुपारी ३.३० ते सायं.५.३० दरम्यान ८० टक्के मतदान झाले.
मतदारांच्या दिमतीला चारचाकी वाहने
ग्रामपंचायत हद्दीतील मात्र शहरात राहणाऱ्या मतदारांना उमेदवारांनी स्वतंत्र चारचाकी वाहन पाठविले होते. शहरातील अनेक भागांत स्वतंत्र वाहनांनी मतदार मतदानासाठी गेले. शिवाय काहींना संक्रांतीची भेटही देण्यात आली. मुळात हा सगळा प्रकार गोपनीय होता; परंतु या सगळ्या दिमतीमुळेच मतदानाने टक्केवारीचा विक्रमी पल्ला गाठल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.