जुलै महिना उजाडला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने औरंगाबाद जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग जमा होऊ लागले आहेत. या गंभीर परिस्थितीशी दोन हात करण्याची वेळ प्रशासनासह आपणा सर्वांवर निसर्गाने आणली आहे. त्यातच सर्वात मोठे संकट पिण्याच्या पाण्याचे असून जिल्ह्यातील जलसाठे कोरडे होऊ लागले आहेत. आहे ते पाणी वाचविण्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतलेली नाही. त्यामुळे काही शेतकरी धरण, तलाव, मध्यम प्रकल्पातील पाण्यावर दरोडा घालत आहेत. प्रशासनाच्या बोथट कारवाईमुळे आहे त्या पाण्याची शेतीसाठी चोरी होत आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांपैकी सर्वाधिक पाणी चोरी सिल्लोड, फुलंब्री व खुलताबाद तालुक्यात होत आहे. इतर पाच तालुक्यातील जलसाठ्यात ‘पाणीबाणी’ असल्याने तेथे मात्र पाण्याची चोरी टळलेलीे आहे. पाऊस लांबल्याने दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना प्रशासनाला आता कुठे हळुवार जाग आली आहे. त्यांनी पाणी रोखण्यासाठी केलेली उपाययोजना धारदार नसल्याने पाण्याचा अवैध उपसा सुरूच आहे. खुलताबाद तालुक्यात प्रशासन ढिम्मसुनील घोडके ल्ल खुलताबादखुलताबादकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या गिरिजा मध्यम प्रकल्पातून शेतीसाठी पाण्याचा अहोरात्र उपसा सुरू असल्याने या प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. तालुका प्रशासनाने याबाबत गंभीरतेने न घेतल्याने खुलताबादकरांना आगामी काळात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.खुलताबाद-फुलंब्री शहरासह २२ गावांना तालुक्यातील येसगाव येथील गिरिजा मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. या प्रकल्पात सध्या जेमतेम पाणी आहे.खुलताबाद शहराला गेल्या वर्षभरापासून नगर परिषदेच्या वतीने तीन दिवस पाणीपुरवठा करण्यात येत आहे. एकीकडे शहराच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्यात येत आहे, तर दुसरीकडे प्रकल्पातील होणाऱ्या पाणी उपशाकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गेल्या वर्षी परतीच्या पावसाने मध्यम प्रकल्पात बऱ्यापैकी पाणीसाठा जमा झाला होता. त्यामुळेच तालुक्यात यंदा पाणीटंचाई जाणवली नाही.तालुक्यात यंदाच्या उन्हाळ्यात एकही टँकर सुरू झाले नाही. तसा प्रस्तावही आजपर्यंत पंचायत समिती कार्यालयात आला नाही; पण पावसाळा सुरू होऊन महिना झाला तरी पाऊस झालाच नाही. त्यामुळे विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. पाझर तलाव, लघु प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाला आहे, तर काही प्रकल्प कोरडेठाक पडले असल्याने येत्या काही दिवसांत पाऊसच पडला नाही तर गावागावातून टँकरचे प्रस्ताव येतील. त्यामुळे प्रशासनास संभाव्य पाणीटंचाईसाठी उपाययोजना करावी लागणार आहे.फुलंब्री तालुक्यात पाणीचोर मोकाटरऊफ शेख ल्ल फुलंब्रीतालुक्यावर यंदा वरुणराजाने अवकृपा केल्याने सुमारे ५० गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. सांजूळ धरणातील पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यात प्रशासनाला अपयश आल्याने पाणीचोर मोकाट झाले आहेत.फुलंब्री तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे १८ टँकर सुरू आहेत, तर ३० गावांना ४० विहिरी अधिग्रहित करून पिण्याचे पाणी पुरविले जात आहे. पाऊस पडला नाही तर येणाऱ्या काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. तालुक्यात गेल्या पाच महिन्यांपासून काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. फुलंब्री तालुक्यातील फुलंब्री व वाकोद येथील मध्यम प्रकल्प कोरडे आहेत.सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक अवैध उपसाराजू वैष्णव ल्ल सिल्लोडतालुक्यात खेळणा, अजिंठा-अंधारी, केळगाव हे ३ मध्यम, तर पेंडगाव, निल्लोड, जळकी हे ३ लघु प्रकल्प असून या ६ प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात अवैध पाणी उपसा केला जात आहे. खेळणा मध्यम प्रकल्पामध्ये १६ टक्के, अजिंठा-अंधारी १३ टक्के, तर केळगाव मध्यम प्रकल्पामध्ये १५ टक्के जलसाठा आहे. खेळणा प्रकल्पामधून सिल्लोड शहर, भराडी, उंडणगाव या गावांसह १२ गावांना पाणीपुरवठा केला जातो. अजिंठा-अंधारी प्रकल्पांमधून अजिंठा, शिवना, मादणी, तर केळगाव प्रकल्पामधून अंभई, जांभई या गावांना पाणीपुरवठा केला जातो. पेंडगाव व निल्लोड लघु प्रकल्पामध्ये मृतसाठा असून जळकी लघु प्रकल्पामध्ये २५ टक्के जलसाठा आहे. पेंडगाव लघु प्रकल्पामधून चारनेर, पेंडगाव, तळणी, आमठाणा या गावांना पाणीपुरवठा केला जातो. निल्लोड लघु प्रकल्पावर निल्लोड, कायगाव, केऱ्हाळा या गावांचा, तर जळकी लघु प्रकल्पामधून हळदा, जळकी, वसई या गावांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे.गंगापुरात पावसाशिवाय पर्याय नाहीलालखाँ पठाण ल्ल गंगापूरतालुक्यात मागील तीन वर्षांत चांगला पाऊस झाला नाही. त्यामुळे जलसाठे पूर्ण क्षमतेने भरले नाहीत. परिणामी तालुक्यात जलसंकट निर्माण झाले आहेत. ‘नांमका’मधील पाण्याचा तालुक्याला काहीच फायदा झाला नाही. आता पावसाच्या पाण्याशिवाय पर्याय उरला नाही. जलसाठ्यातून पाण्याचा उपसा मात्र होत नाही.गंगापूर तालुक्याला पाण्यासाठी वरदान ठरतील असे टेंभापुरी मध्यम प्रकल्प, शिल्लेगाव प्रकल्प, खोजेवाडी यासह अनेक प्रकल्प तयार आहेत. या प्रकल्पांवर शासनाकडून लाखो रुपये खर्च सुरू आहे; मात्र पुरेसा पाऊस पडला नाही. यामुळे विहिरींनी तळ गाठला.
जलदरोडा
By admin | Updated: July 3, 2014 00:56 IST