चित्तेपिंपळगाव परिसरातील भालगाव, आडगाव, झाल्टा, आडगाव, खोडेगाव, घारदोन, गाडीवाट, चिंचोली- एकोड पाचोड, लायगाव, आपतगाव, काद्राबाद, चितेगाव, चितेपिंपळगाव गारखेडा आदी गावातील शेतकऱ्यांनी रोहिणी व मृग नक्षत्रात जेमतेम पाऊस पडल्याने पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने कापूस, मका, तूर, मूग, सोयाबीन या पिकांची उगवण क्षमता योग्य प्रमाणात झाली नाही. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. बियाणे, खताचे व शेती मशागतीचे दर वाढल्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. यातच पेरणी वाया जाण्याची भीती असून, पावसाने दडी मारल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. येत्या पाच ते दहा दिवसांत जर पाऊस पडला नाही तर उन्हामुळे हे पीक करपून जाईल. त्यामुळे पुन्हा दुबार पेरणी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया प्रगतीशील शेतकरी भास्कर गावडे यांनी दिली.
दुबार पेरणीच्या संकटाने शेतकरी चिंतित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST