औरंगाबाद : २००८ साली गंगामाई साखर कारखान्याला ऊस देणाऱ्या ५३ गावांतील ६९२ शेतकऱ्यांना वाहतूक अनुदान रकमेचे ६६ लाख २३ हजार ३६ रुपये वाटप करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. त्यानुसार ११ ते २० आॅगस्टदरम्यान शेतकऱ्यांना त्यांनी पुरवठा केलेल्या उसानुसार धनादेश देण्यात येणार आहेत.घाटनांद्रा (ता. सिल्लोड) येथे कार्यरत असताना २००८ मध्ये गंगामाई साखर कारखान्यास गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला होता. शासनाने ऊस उत्पादकांना ऊस वाहतूक अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार गंगापूर तालुक्यातील ५३ गावांमधील ६९२ शेतकऱ्यांचे ६६ लाख २३ हजार ३६ रुपये कारखान्याच्या स्वाधीन केले होते. कारखान्याने मात्र, ही रक्कम शेतकऱ्यांना दिली नाही. दरम्यान, हा कारखाना अहमदनगर जिल्ह्यात स्थलांतरित झाला. विश्वनाथ पुंजाराम दारुंटे आणि इतर शेतकऱ्यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे देण्यासंदर्भात संबंधितांना निर्देश देण्याची विनंती केली होती. उभय पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे आणि न्यायमूर्ती व्ही. एल. आंचलिया यांनी याचिका मंजूर केली. साखर कारखान्याने ही रक्कम प्रादेशिक साखर सहसंचालक यांच्याकडे जमा करावी आणि सहसंचालकांनी वेळापत्रक तयार करून शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम वाटप करण्याचे आदेश दिले.खंडपीठाच्या आदेशानुसार ११ ते २० आॅगस्टदरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांना धनादेश वाटप करण्यात येत असल्याची माहिती सहसंचालक बी. एस. जाधव यांनी दिली. ते म्हणाले की, ११ रोजी आगर वडगाव, अंमळनेर, आंबेवाडी येथील शेतकऱ्यांना धनादेश वाटप केले जाणार आहेत.
शेतकऱ्यांना मिळणार ‘गंगामाई’कडे थकलेले ६६ लाख २३ हजार रुपये
By admin | Updated: August 11, 2014 01:56 IST