सोयगाव : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सोयगाव तालुक्यात अचानक कपाशीवर बोंडअळीचा मोठा प्रादुर्भाव झाला. यामध्ये तालुक्यातील २७ हजार ५४६ हेक्टर बाधित झाल्याचा प्राथमिक अहवाल तालुका प्रशासनाच्या वतीने गुरुवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे. या अहवालावरून पंचनाम्यांचे आदेश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याची माहिती हाती समोर आली आहे.
सोयगावसह तालुक्यात अतिवृष्टीनंतर बदललेल्या वातावरणामुळे सोयगाव तालुक्यातील कपाशी पिकांवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. प्रारंभी हा प्रादुर्भाव ठिबक सिंचनवरील कपाशी पिकांवर आढळून आल्यानंतर कोरडवाहू कपाशी पिकांनाही या गुलाबी बोंडअळीने घेरले. प्राथमिक पाहणीअंती २७ हजार ५४६ हेक्टरवर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. आधीच अतिवृष्टीचा तडाखा त्यानंतर बोंडअळीमुळे शेतकरी धास्तावले आहेत. तहसीलदार प्रवीण पांडे यांनी दखल घेऊन तातडीने कृषी विभागाला पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. या पाहणीचा अहवाल तालुका कृषी विभागाकडून प्राप्त होताच महसूल विभागाने या अहवालाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे.
----
ऑगस्ट महिन्यात लाल्याचेही आक्रमण
आगस्ट महिन्यात सोयगाव तालुक्यात लाल्याचाही प्रादुर्भाव आढळून आला होता. बनोटी आणि सोयगाव, जरंडी या महसुली मंडळात काही भागात अचानक ऑगस्ट महिन्यात लाल्याचाही प्रादुर्भाव काहीसा आढळून आला होता. या रोगाचीही अहवालात नोंद करण्यात आली आहे. सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना लाल्या, बोंडअळीच्या प्रादुर्भावाचा मावेजा मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
---
शेतकऱ्यांना मावेजा मिळण्याची आशा
पाहणीचा अहवाल तालुका कृषी विभागाकडून प्राप्त होताच महसूल विभागाने हा अहवाल पुढील अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविला आहे. त्यामुळे आता बोंडअळीच्या पंचनाम्यांच्या आदेशाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.
----
पदवीधर निवडणुकांचा ठरला अडसर
सप्टेंबर महिन्यात झालेल्या बोंडअळींच्या प्रादुर्भावाची धग थेट डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत कायम राहिल्याने सोयगाव तालुक्यातील कपाशीचा हंगाम नोव्हेंबरपर्यंत उद्ध्वस्त झाला होता. शेतकऱ्यांनी कपाशी पिकांना आग लावून व उपटून फेकून दिल्या होत्या; परंतु पदवीधरच्या निवडणुकांच्या कार्यक्रमामुळे प्रशासनाला वेळच न मिळाल्याने अहवाल पाठविण्याला दिरंगाई झाली होती.
छायाचित्र - सोयगाव तालुक्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने किडलेली कपाशीची बोंडे.