लोकमत न्यूज नेटवर्कगंगाखेड: वडिलांच्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास वझूर येथे घडली. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.पूर्णा तालुक्यातील वझूर येथील शिवाजी तुकाराम वैराट (२४) या तरुणाने शेती पिकत नाही, पाऊस वेळेवर पडत नाही, वडिलांच्या नावे असलेले युनियन बँकेचे कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेतून ३१ आॅगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास गावात असलेल्या प्लॉटवरील बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच गंगाखेड पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन १ सप्टेंबर रोजी नातेवाईकांच्या स्वाधीन केला. या प्रकरणी शंकर तुकाराम वैराट यांच्या फिर्यादीवरुन गंगाखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाजी वैराट यांच्या पश्चात वडील, दोन भाऊ, एक बहीण, पत्नी असा परिवार आहे.या प्रकरणाचा तपास पोउपनि. रवि मुंडे, सपोउपनि.बळीराम जाधव, पोना.दत्तराव पडोळे, दत्तराव जाधव, गणेश वाघ हे करीत आहेत.
शेतकरी पुत्राची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 23:56 IST