परभणी : पाथरी रस्त्यावरील एका जिनिंगला कापूस विक्री केल्यानंतर संबंधित जिनिंगकडून शेतकऱ्यांचे कापसाचे थकित पैसे मागील दहा दिवसांपासून देण्यात आलेले नाहीत. सोमवारी जिनिंग परिसरात ५० ते ६० शेतकऱ्यांनी पैशाच्या मागणीसाठी ठिय्या मांडला.परभणी कृउबाअंतर्गत जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांनी आपला कापूस देण्यात येणाऱ्या भावाप्रमाणे पाथरी रस्त्यावरील सक्सेस कॉटन जिनिंगकडे विक्री केला होता. या सर्व शेतकऱ्यांना जिनिंग प्रशासनाकडून त्यांचे थकित पैसे घेऊन जाण्यासाठी वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या. १६ एप्रिल पासून २५ एप्रिलपर्यंत अनेक शेतकऱ्यांचे थकित पैसे प्रशासनाने न दिल्याने ५० ते ६० शेतकऱ्यांनी सोमवारी जिनिंग परिसरात सकाळी १० वाजेपासून ठिय्या मांडला. मात्र जिनिंग प्रशासनाकडून सायंकाळी ६.३० पर्यंत एकाही शेतकऱ्याला पैशांचे वाटप करण्यात आले नव्हते. याबाबत पैसे देण्याच्या मागणीचे निवेदन शेतकऱ्यांनी दिले आहे. निवेदनावर मंगेश किशन केकान, दिनकर प्रल्हाद देशमुख, पांडुरंग अश्रोबा खुणे, गुलाब श्रीकृष्ण जाधव, सुरेश हारकळ, ज्ञानोबा हारकळ, शंकर हारकळ, हेंमत शिनगारे, रामकिशन काळदाते, दौलत कोडगीर, मारोती इक्कर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास जिनिंगचे व्यवस्थापक खुळे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून मंगळवारी सकाळी ११ वाजता येण्यास सांगितले. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांचा जिनिंगसमोर ठिय्या
By admin | Updated: April 25, 2016 23:32 IST