लोकमत न्यूज नेटवर्कबीड : उन्हाळी हंगामाप्रमाणेच खरीप हंगाम जोमात यावा याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. खरिपासाठी राखून ठेवलेल्या क्षेत्रावर नांगरणी, मोगडणी, कोळपणीची कामे अंतिम टप्प्यात असून, बी-बियाणाची चाचपणी केली जात आहे.काळाच्या ओघात शेतकऱ्यांनी यांत्रिकीकरणावर भर देऊन मशागत पद्धतीत बदल केला आहे. बैलजोडीची जागा ट्रॅक्टरने घेतल्याने नांगरणीसह कोळपणीची कामे याद्वारे केली जात आहेत. यामुळे वेळेची बचत होत असली तरी नैसर्गिकरीत्या होणारे कीड नियंत्रण धोक्यात येऊ लागले आहे. उन्हापासून बचाव व्हावा या दृष्टीने रात्रीच्या वेळीच मशागतीची कामे होत आहेत. यापूर्वी दिवसा बैलजोडीच्या साह्याने केल्या जाणाऱ्या मशागतीमुळे पशु-पक्षी मशागत क्षेत्रातील कीड नामशेष करीत होते. मात्र, अत्याधुनिक यंत्राचा वापर वाढल्याने दिवसेंदिवस हुमणी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी, उत्पादनात घट होत असल्याचे दिसून येत आहे.अक्षय तृतीयेनंतर खरीप हंगामाला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. नांगरणी, मोगडणी करून सुमारे तीन वेळा उभ्या-आडव्या पाळी घालणे गरजेचे असते. यंदा शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातूनही उत्पादन वाढीसाठी हातभार लागला आहे. खरीप हंगाम हा महत्त्वाचा असून, उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांचे प्रयत्न राहणार आहेत. काही ठिकाणी मशागतीची कामे पूर्ण झाली असून, शेणखताची विस्कटीची कामे सुरू आहेत.
खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची लगबग
By admin | Updated: May 18, 2017 23:16 IST