अंबाजोगाई : केंद्र व राज्य शासन शेतकरी विरोधी धोरण राबवित असल्याने शेतकऱ्यांची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर शेतकरी संघटीत होवून बँका फोडतील असा सूचक इशारा आ.बच्च कडू यांनी दिला.प्रहार संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने ११ एप्रिलपासून नागपूर येथून निघालेली आसूड यात्रा २१ एप्रिल रोजी वडनगर येथे जात आहे. ही यात्रा गुरूवारी सायंकाळी अंबाजोगाईत पोहचली. आ.बच्चू कडू बोलत होते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष कालीदास आपेट, प्रा.सुशिला मोराळे, राजाभाऊ गोकुळआष्टमी, प्रा.अंजली पाटील, अॅड.मनीषा रूपनर, डॉ.नरेंद्र काळे, संजय कुंबेफळकर उपस्थित होते.यावेळी आ.बच्चु कडू म्हणाले, शेतकऱ्यांना झुलवित ठेवण्याचे काम केंद्र व राज्य सरकार करीत आहे. आगामी काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय न घेतला तर शेतकरी एकत्रित येवून बँका फोडतील तसेच शेतकऱ्यांच्या कसल्याही कर्जाची वसूल दिली जाणार नाही. शासनाने १५ एप्रिल रोजी तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घेतला तर मंत्र्यांच्या घरात आसूड यात्रा घसवली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी रघुनाथदादा पाटील म्हणाले, ज्या प्रमाणात जमिनीच्या किंमती शासनाने ठरविल्या त्याच प्रमाणात शेतकऱ्यांना कर्ज वाटप झाले पाहिजे. सोने तारण ठेवून कर्ज देता तसेच जमिनीला का देत नाहीत. हा दुजाभाव शासनाने बंद करावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी बोलताना कालिदास आपेट म्हणाले, काँग्रेस व भाजपा सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत. सर्व धोरणे शासन शेतकरी विरोधी राबवित असल्याने दिवसेंदिवस शेतकरी कर्जबाजारीच होत असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक प्रा.अंजली पाटील यांनी तर आभार अॅड. मनीषा रूपनर यांनी मानले. आसूड यात्रेचे शहरात फटाक्याची आतषबाजीसह स्वागत झाले. (वार्ताहर)
...तर शेतकरी बँका फोडतील -बच्चू कडू
By admin | Updated: April 14, 2017 00:52 IST