जालना: जिल्हयात शेत तिथे शेततळे निर्माण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी परिपूर्ण तयारी करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी रविवारी दिले.जालना येथे आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, तहसीलदार रेवनाथ लबडे, परतूरचे तहसीलदार गुंडमवार, मंठयाचे तहसीलदार पवार , परतूर तालुका कृषी अधिकारी तौर तसेच तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक उपस्थित होते.पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, शेततळ्यामुळे जलसंधारणापेक्षा पाण्याचे साठे निर्माण होणार असल्याने त्याचा शेतकऱ्यांना दूरगामी फायदा होणार आहे. म्हणूनच अधिकाऱ्यांनी या कामाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन प्रत्येक गावात किमान १० विहीर पुनर्भरणाची कामे हाती घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.दुष्काळ सदृश परिस्थितीत शेतकऱ्यांना अल्पदरात गहू व तांदळाचा पुरवठा करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याने जिल्हयातील प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना या धान्याचे वाटप करण्यात यावेत. एकही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देशही लोणीकर यांनी दिले. दुष्काळ सदृश परिस्थितीत मजुरांचे स्थलांतर रोखून त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गावातच कामे उपलब्ध करुन देण्याचे आदेशही त्यांनी दिले.
शेत तिथे शेततळे; यंत्रणांनी तयारी करावी- लोणीकर
By admin | Updated: September 6, 2015 23:54 IST