औरंगाबाद : दुष्काळामुळे देशात डाळींचे उत्पादन घटले आहे. याचा फायदा साठेबाजांनी घेऊ नये, यासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात डाळींच्या भावात मंदी आली. राजस्थान व उत्तर प्रदेशात उन्हाळी मुगाचे उत्पादन चांगले झाल्याची वार्ता बाजारात पसरली. या साऱ्यांचा एकत्रित परिणाम स्थानिक बाजारपेठेवर दिसून आला. हरभरा व मसूर डाळ वगळता अन्य डाळींच्या भावात किलोमागे १० ते १५ रुपयांची घट झाली आहे. यामुळे गृहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे.साठेबाजांवर कारवाई होणार, या भीतीने व्यापाऱ्यांनी गरजेपुरत्याच डाळी दुकानात ठेवल्या आहेत. पुरवठा विभागाचे अधिकारी कधीही येऊन दुकानातील साठ्याची तपासणी करू शकतात. यामुळे व्यापारीही डाळीचा साठा करण्याचे धाडस करीत नसल्याचे दिसून आले. वार्षिक धान्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची संख्याही आता रोडावली आहे. त्यात राजस्थान व उत्तर प्रदेशात उन्हाळी मुगाचे उत्पादन चांगले झाल्याची बातमी व्यापारी वर्गात पसरली. परिणामी बाजारातील मूग डाळीच्या भावात १० ते १५ रुपयांपर्यंत घट होऊन सध्या ८० ते ८५ रुपये किलोने विकली जात आहे. मागील महिन्यात हीच डाळ ९५ ते १०० रुपये किलो झाली होती. आयातीत तुरीचे भाव कमी झाल्याने त्याचा परिणाम तूर डाळीवर दिसून आला. १० रुपयांनी भाव कमी होऊन तूर डाळ ११८ ते १२५ रुपये किलोने विकत आहे.
डाळींच्या भावात घसरण
By admin | Updated: May 24, 2016 01:19 IST