सिल्लोड : तालुक्यातील शिंदेफळ येथे ताप येणे, डोके दुखणे, प्लेटलेट (पांढर्या पेशी), अशी लक्षणे असलेल्या संक्रमक आजाराचा एक रुग्ण दि.२९ एप्रिल रोजी आढळला. त्याला लगेच सिल्लोड येथे एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर गावामध्ये दररोज एकामागून एक वरील लक्षणे असलेल्या संक्रमक आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची माहिती आमठाणा येथील प्राथमिक आरोग्य विभागाला देऊनही त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने गावामध्ये डेंग्यूसदृश आजाराच्या रुग्णांची संख्या ३० ते ३५ च्या जवळपास पोहोचली आहे. आठ दिवसांपूर्वी शालिक महादू साळवे (२०), सविता गोरख अक्करकर (२५), गोरख सुनील अक्करकर (६), नारायण बाजीराव अक्करकर (२२), भगवान भीमराव अक्करकर (४०), संतोष काशीनाथ अक्करकर (१२) या सहा जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याने त्यांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याची माहिती आमठाणा प्राथमिक आरोग्य विभागाला देण्यात आली होती. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून शिंदेफळ गाव अवघ्या ३ कि.मी.अंतरावर असूनही आरोग्य विभागाचे अधिकारी व क र्मचारी तेथे फिरकले नाहीत. प्राथमिक आरोग्य विभागाने दुर्लक्ष केल्याने गावकर्यांनी याची माहिती तालुका आरोग्य अधिकार्यांना दिली. तेव्हा आरोग्य विभाग खडबडून जागा झाला. तालुका आरोग्य अधिकारी हे आमठाणा येथील आरोग्य विभागाच्या पथकासह बुधवारी गावात पोहोचले. सदर आजाराची लक्षणे डेंग्यूसदृश असून रुग्णांच्या रक्ताचे नमुने औरंगाबाद येथे पाठविण्यात आले आहेत. तपासणीच्या अहवालानंतर रोगाचे योग्य निदान होईल, अशी माहिती प्रभारी तालुका अधिकारी एम.पी. महेर यांनी दिली. दरम्यान, गुरुवारी पुन्हा रामेश्वर नारायण दुतोंडे (१९), कडूबाई यादव अक्करकर (४८), कमलबाई बाजीराव अक्करकर (४५), कलाबाई लक्ष्मण दांडगे (४०), सिराज नियाजअली शहा (२५), रेखा अनिल अक्करकर, रवींद्र नामदेव दुतोंडे (१६), नंदाबाई नामदेव दुतोंडे (४०), भोलू विकास दांडगे (५) या ९ रुग्णांना वरील लक्षणेअसलेल्या संक्रमक आजाराचा त्रास जाणवल्याने त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तपासणीत मलेरिया नसल्याचे निष्पन्न झाले. डेंग्यूसदृश आजाराच्या तपासणीसाठी या ९ रुग्णांचे नमुने औरंगाबाद येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबूराव सपकाळ यांनी दिली. (वार्ताहर) केंद्र झाले ‘असून अडचण, नसून खोळंबा’ आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी व कर्मचारी वेळकाढूपणा करीत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. आरोग्य अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने कर्मचार्यांवर वचक राहिलेला नाही. अधिकारीच पूर्ण वेळ थांबत नसल्याने याचा फायदा घेत कर्मचारीही रुग्णांकडे कानाडोळा करीत आहेत. यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना जाऊनही उपचार मिळत नसल्याने प्राथमिक आरोग्य कें द्र ‘असून अडचण, नसून खोळंबा’ बनले आहे. अधिकार्यांची भेट डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आलेल्या शिंदेफळ गावास जिल्हा हिवताप अधिकारी वैष्णव यांनी भेट देऊन गावकर्यांना आरोग्याबाबत सूचना केल्या. आमठाणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक गावात ठाण मांडून बसलेले आहे. जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. वैष्णव, डॉ. शेळके व इतर कर्मचार्यांनी गावात फिरून गावकर्यांना मार्गदर्शन केले व घाबरून न जाण्याचे आवाहन केले. वैद्यकीय अधिकारी विद्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राठोड, काथार, आरोग्यसेवक आदींनी परिश्रम घेतले आहेत.
आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने ग्रामस्थांमध्ये रोष
By admin | Updated: May 9, 2014 00:05 IST