उस्मानाबाद : शासनाने राष्ट्रीय कृषी विमा योजना खरीप हंगाम २०१४ या योजनेत बँकेत विमा प्रस्ताव सादर करण्याची मुदत यापूर्वी ३१ जुलैपर्यंत दिली होती. परंतु आता शासनाने पुरक पत्र काढून ही मुदत बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी खालील अटीच्या आधीन राहून १६ आॅगस्टपर्यंत वाढविली आहे. शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. ही मुदतवाढ ३१ जुलै नंतर परंतु वाढीव दिनांकापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रासच लागू राहील. शेतकऱ्यांनी पीक विमा प्रस्तावावर पीक परिस्थिती सर्वसाधारणपणे चांगली असल्याची नोंद करणे आवश्यक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा प्रस्तावासोबत पेरणीचे क्षेत्र स्पष्टपणे नमूद केलेले विहित सक्षम प्राधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. बँकांनी सदर प्रमाणपत्र तपासून भविष्यातील उपयोगाकरिता दप्तरी सांभाळून ठेवावे, प्रस्तूत मुदतवाढ सर्वसाधारण विमा संरक्षण मर्यादेपर्यंत म्हणजेच उंबरठा पातळीपर्यंत देय राहील. वाढीव विमा संरक्षण देय राहणार नाही. सोबतच्या प्रपत्रात नमूद पिकाकरिता विहित करण्यात आलेल्या विमा हप्ता दरात अंशत: बदल करण्यात आला असून, सदर सोबतच्या प्रपत्रात नमूद केल्यानुसार असतील तसेच सदर पिकाकरिता यापूर्वी विमा संरक्षण घेतलेल्या प्रकरणातही आता विहित करण्यात आलेले दरच राहील, याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी, असेही पत्रकात कळविले आहे.१२०० जणांनी भरला विमामाकणी : लोहारात तालुक्यातील माकणी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत ३१ जुलै रोजी पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती. परिसरातील तब्बल १ हजार २०० शेतकऱ्यांनी पिके विमा संरक्षित केली आहेत. अत्यल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरणी उरकली आहे. अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे रिमझिम स्वरूपाच्या पावसावर पिके कशीबशी तग धरून आहेत. भविष्यात दमदार पाऊस न पडल्यास ही पिके हाती लागतीलच याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतकरी पीक विमा भरण्यावर अधिक भर देताना दिसून येत आहे. विमा भरण्यासाठी ३१ जुलैैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी गुरूवारी येथील जिल्हा बँकेच्या शाखेत पीक विमा भरण्यासाठी एकाच गर्दी केली होती. परिसरातील तब्बल १ हजार २०० शेतकऱ्यांनी येथील शाखेत विमा रक्कम भरली आहे. शाखेअंतर्गत माकणी, करजगाव, चिंचोली, तावशी, उदतपूर आदी गावांचा समावेश आहे.
१६ आॅगस्टपर्यंत मिळाली मुदतवाढ
By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST