जालना: केंद्रापाठोपाठ राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आरुढ होणार असून, या सत्तेतही जिल्ह्यास वाट मिळेल अशी चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत या जिल्ह्याने भाजपास मोठी साथ दिली. रावसाहेब दानवे हे तब्बल २ लाख मतांनी विजयी झाले. तेव्हा केंद्रिय मंत्रिमंडळात दानवे यांना स्थान मिळेल असे स्पष्ट संकेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळात दानवे यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. पर्यायाने या जिल्ह्यास केंद्रिय मंत्रिमंडळात पहिल्यांदाच प्रतिनिधित्व मिळाल्यामुळे राजकीय क्षेत्रासह जिल्ह्यात मोठा आनंद व्यक्त झाला. या पार्श्वभूमीवरच विधानसभा निवडणुका आल्या. त्यातही भाजपाने पाचपैकी तीन जागा पटकावून मोठी मुसंडी मारली आहे. त्यामुळेच राज्यातील सत्ता परिवर्तनात या जिल्ह्यास निश्चितपणे वाटा मिळणार अशी चिन्हे आहेत. भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबनराव लोणीकर हे परतूरमधून निवडून आले आहेत. ते तिसऱ्यांदा विधानसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. १९९९ व २००४ च्या निवडणुकीत ते सलग दोन वेळा विजयी झाले होते. २००९ च्या निवडणुकीत ते पराभूत झाले. परंतु गेल्या निवडणुकीत पराभावाचा लोणीकर यांनी या निवडणुकीत वचपा काढला.त्यामुळेच भाजपातील त्यांची ज्येष्ठता ओळखूनच राज्यमंत्री मंडळात वर्णी लागू शकेल अशी शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात भाजपाचे भोकरदन व बदनापुरात दोन ठिकाणी उमेदवार विजयी झाले आहेत. ते दोघेही पहिल्यांदाच विधाभसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. विशेषत: संतोष दानवे यांचे वडील हे केंद्रिय मंत्रिमंडळात प्रतिनिधीत्व करीत आहेत. एका कुटुंबात सत्तेत दोनदा प्रतिनिधीत्व वरकरणी शक्य वाटत नाही. राहिला प्रश्न नवनिर्वाचित आ. नारायण कुचे यांचा. तेही जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात नवखे आहेत. त्यामुळे त्यांचीही वर्णी लागेल असे चित्र नाही. या पार्श्वभूमीवर लोणीकर यांचा दावा प्रबळ ठरतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
सत्ता परिवर्तनातही वाटा अपेक्षित
By admin | Updated: October 21, 2014 00:56 IST