गजानन वानखडे , जालनायेथील पंचायत समिती विभागातील चार विभागांनी गेल्या पाच वर्षात विजेचा बेसुमार वापर केला खरा. मात्र बील भरण्याची वेळ आली तेव्हा सर्वांनीच हात वर केले. त्यामुळे महावितरणने वीज कनेक्शन कट करून टाकले. बीडीओच्या मीटरमधून गटशिक्षणाधिकारी अधिकाऱ्यांनी वीज घेतली. बांधकाम विभागाने नवीन मीटर घेतले. पाणी पुरवठा विभागाचे कार्यालयच येथून हालले. राहिला प्रश्न पशुसंवर्धन विभागाचा. हा विभाग सध्या अंधारातच आहे. पंचायत समितीचे वीजमीटर पाणीपुरवठा विभागाच्या नावाने महावितरणकडून घेण्यात आले. या मीटरमधून बांधकाम विभाग, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पशुसंवर्धन विभाग आदींना वीज देण्यात आली. प्रत्येक महिन्याला येणारे देयक कोणी भरावे यावरून अनेक वेळा खटके उडाले. ‘आज तुम्ही भरा, उद्या आम्ही भरू’ या टोलवाटोलवीत तब्बल ८० हजाराचे देयक थकल्याने महावितरणने नोटीस बजावली. देयक अदा करण्यास काही महिन्यांची सवलत सुद्धा दिली. परंतु सर्वच विभागाने देयक भरण्यास हात वर केल्याने तब्बल पाच वर्षे चारही कार्यालयांचा कारभार विजेविना सुरू होता. त्याचा सर्वात जास्त फटका बसला तो सर्वसामान्य नागरिकांना. वीज नाही हे कारण सांगून नागरिकांची कामे करण्यास काही कर्मचारी टाळाटाळ करू लागले. पंचायत समितीच्या परिसरातून पाणीपुरवठा विभागाने दुसरीकडे संसार थाटल्याने अनेक विभागाची गोची झाली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाच्या नावाने असलेले वीज देयक भरल्याशिवाय नव्याने मिटर देण्यास महावितरण कार्यालयाने नकार दिला. परिणामी सर्वच विभागांची अडचण झाली. गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी आपल्या विभागाच्या मीटरमधून गटशिक्षणाधिकारी कार्यालयाला सबमीटर बसविण्याची परवानी दिली. दोनच दिवसांपुर्वी या कार्यालयात दिवे लागले. राहिला प्रश्न पशुसंवर्धन विभागाचा. पाच वर्षांपासून हे कार्यालय अंधारातच आहे.
वीज वापरली सर्वांनी,बील भरायचे कोणी?
By admin | Updated: January 21, 2015 01:06 IST