पाटोदा: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे ओळखपत्र देण्यासाठी केवळ २०१३ पूर्वीच्या स्वस्त धान्याच्या शिधापत्रिका असणारेच लाभार्थी पात्र असतील, अशी अप्रत्यक्ष अट येथील प्रशासनाने घातली होती. तसेच सामान्यांसह रूग्णांचे हाल होत होते. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. एकंदरच याची दखल घेऊन ही अट आता रद्द करण्यात आली आहे.सामान्य व गरीब कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सुविधांचा लाभ माफक दरात घेता यावा, त्यांच्या आरोग्याची हेळसांड होऊ नये तसेच योग्य उपचाराअभावी जीवितास धोका होऊ नये यासाठी सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा महाराष्ट्रात प्राधान्याने लाभ घेतला जात आहे. ज्या कुटुंबियांकडे बीपीएल शिधापत्रिका, एपीएल, अन्नपूर्णा आणि अन्त्योदय योजनेखालील शिधापत्रिका आहेत. त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेखालील लाभार्थ्यांना आरोग्यपत्र देण्यात येते. आरोग्यपत्र वितरणासाठी पुरवठा विभागाने वितरित केलेल्या शिधापत्रिकांची यादी उपयोगात आणली जाते. असे असले तरी ज्यांची शिधापत्रिका नवीन आहे किंवा ज्यांच्या शिधापत्रिकांची डाटा एन्ट्री झाली नाही अशांना या योजनेपासून वंचित ठेवले जात होते. शिवाय ज्यांना आरोग्यपत्र दिले त्यांनाही ३१ आॅक्टोबर २०१३ पूर्वीची शिधापत्रिका असल्याचे प्रमाणपत्र तहसीलमधून काढण्यास सांगितले जात होते. यामुळे नागरिकांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. यामुळे ही अट रद्द करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. या संदर्भात ‘लोकमत’ने वृत्तही प्रकाशित केले होते. एकंदरच या सर्वाची दखल घेऊन लादलेली ही अट आता दूर केली आहे. यामुळे या योजनेचा लाभ घेणे सोयीस्कर ठरत आहे. या संदर्भात तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश लोखंडे म्हणाले, अट नसल्याबाबत आम्हाला सूचना आल्या आहेत. तसेच पुरवठा विभागाने त्यांच्याकडील डाटा एन्ट्री दुरूस्त केल्यास सर्वांना आरोग्य पत्र देऊ.(वार्ताहर)
अखेर जीवनदायी आरोग्य योजनेसाठीची अट रद्द
By admin | Updated: July 1, 2014 01:02 IST