हिंगोली : रखडून पडलेल्या हंगामी वसतिगृहांचा मुद्दा अखेर निकाली निघाला. मंगळवारी घेण्यात आलेल्या कार्यनियोजन बैठकीत १०६ हंगामी वसतिगृहांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने स्थलांतरितांच्या पाल्यांना आधार मिळाला आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत एकूण १०६ वसतिगृहांच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आली. जिल्ह्यात पूर्वी ८० हंगामी वसतिगृहांची सुविधा होती. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाल्याने नवीन २६ हंगामी वसतिगृहे वाढविली आहेत. जि.प.च्या एकूण ३६ शाळांतील २ हजार ४४० विद्यार्थ्यांना हंगामी वसतिगृहात प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी संबंधित मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीनुसार तीन दिवसांत हंगामी वसतिगृहाच्या उद्घाटनाच्या फोटोसह गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत अहवाल शिक्षण विभागाकडे आणून द्यायचे आहेत. त्यानंतरच वसतिगृहासाठी लागणारा निधी वर्ग होणार असल्याचे शिक्षण खात्याकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर विविध योजना राबविण्यात येत आहेत. परंतु सदर योजना काही कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे प्रभावीपणे राबविल्या जात नाहीत. परिणामी, योजनेच्या लाभापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते. बैठकीस शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे, प्राचार्या जयश्री आठवले, उपशिक्षणाधिकारी पातळे, प्रभारी शिक्षणाधिकारी डी. आर. गुप्ता, एपीआय संतोष पाटील, पाईकराव, बाबूराव पवार, सुदाम गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अखेर १०६ हंगामी वसतिगृहे मंजूर
By admin | Updated: December 15, 2015 23:31 IST