जालना : पावसाचा बेभरोसेपणा आणि उशिराने सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी म्हणावी तशी खताची खरेदीच केली नाही. जिल्ह्यासाठी आलेल्या एक लाख ३१ हजार मेट्रिक टनपैकी अद्यापही ३८ हजार मेट्रिक टन खत पडून असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पावसाने गेल्या तीन वर्षांपासून हुलकावणी दिल्याने पेरणी आधी खते खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस सुरू झाल्यावर खते खरेदी करण्याकडे कल दिसून आला आहे. यंदा चांगला पाऊस पडेल असे हवामान खात्याने तीन महिन्यांपूर्वीच जाहीर केले होते. त्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे खताची कमतरता भासू नये यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने मागणी केल्याने मागणीपेक्षा जास्त विविध कंपनीचे खत जिल्ह्याला देण्यात आले. खरीप हंगात सुरू होण्यापूर्वीच एक लाख ३१ हजार मेट्रिक टन खत आले आहे. त्यापैकी १४ जुलैपर्यंत ९८ हजार ८०८ मेट्रिक टन खताची जिल्ह्यातील विविध वितरकांनी उचल केली आहे. परंतु अनेक कृषी केंद्रांमध्ये विविध कंपन्यांच्या खताची उचल म्हणावी तशी मागणी नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात गत आठवड्यापासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वच कंपन्यांच्या खताच्या किंमतीत १५० ते २०० रूपयांपर्यंत घट झाली आहे. खत खरेदी करण्याची शेतकऱ्यांची उदासिनता आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन सुध्दा करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी) यंदा चांगला पाऊस पडेल असे हवामान खात्याने तीन महिन्यांपासूनच जाहीर केले होते. त्यासाठी दुष्काळग्रस्त भागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे खताची कमतरता भासू नये यासाठी जि.प. कृषी विभागाने मागणी केल्याने आकडेवारीपेक्षा जिल्ह्याला जास्त विविध कंपनीचे खते देण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी यंदा पाऊस पडेल की नाही याची शाश्वती नसल्याने खत खरेदी करण्याची अनुत्सकता दाखविली. कृषी विभाग शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याचे पवार म्हणाले. जुलै, आगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून खताची उचल होत असते. परंतु जिल्ह्यात जुलैत पावसाने जोरदान हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना शेतात खत टाकण्यासाठी उसंत मिळाली नाही. तसेच सततच्या तीन वर्षांपासून दुष्काळ असल्याने पाऊस वेळेवर पडेल का नाही याची शेतकऱ्यांना शाश्वती नाही. परिणामी अनेक शेतकऱ्यांनी खत खरेदी करण्यात उदासिनता दाखविली. सध्या जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस होत असल्याने खताची मागणी वाढणार आहे. - प्रशांत पवार, प्रभारी कृषी अधिकारी जि.प.
समाधानकारक पाऊस तरीही खत पडूनच.
By admin | Updated: July 15, 2016 00:46 IST