हिंगोली : शहरात आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांच्या दयनीय अवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गणेशोत्सव, शारदोत्सव, दसरा महोत्सव असे एका पाठोपाठ एक असे सगळे सण- उत्सव येत असताना शहरात येणाऱ्यांचे स्वागत खड्डेमय रस्त्यांतून होत आहे.शहरातून जाणारा महामार्ग बांधकाम खात्याने मागील तीन वर्षांपासून खोदून ठेवला. याच मार्गाला लागून दसरा मैदान आहे. तेथे महोत्सवासह आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सभाही होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी पंकजा पालवे यांची सभा झाली तेव्हा पोलिस प्रशासनाला मोठी कवायत करावी लागली. तरीही वाहतुकीचे तीनतेरा वाजले होते. शिवाय ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले. मात्र जिल्हा प्रशासनाने आता या कामाला गती देण्यासाठी स्वतंत्र बैठक घेतल्याशिवाय गत्यंतर दिसत नाही.नगरपालिकेच्या हद्दीतीलही अनेक रस्त्यांचा प्रश्न आहे. जवाहर रोड, पोस्ट आॅफिस रोड, गांधी चौक मार्ग, तलाब कट्ट्याकडे जाणारा रस्ता, रिसाला, जिजामातानगर अशा सगळीकडच्याच काही रस्त्यांचे हाल आहेत. मात्र आगामी काळात शहरात भूमिगत गटार योजनेचे काम होणार असल्याने रस्त्यांच्या कामाचा प्रस्ताव प्रलंबित असल्याचे नगराध्यक्षा अनिता सूर्यतळ यांनी सांगितले. तरीही काही दुरुस्तीचे कामे होतील, अशा त्या म्हणाल्या. तसेच गणेश विसर्जन मार्गावर साफसफाईसह रस्त्याच्या तात्पुरत्या डागडुजीची कामे केली जात आहेत. यासाठी मंगळवारी दिवसभर नगरपालिकेच्या यंत्रणेने विसर्जन मार्गावर रस्त्यातील अडचणी दूर करण्यासाठी कामे केली.मात्र शहरातील इतर रस्त्यांकडेही लक्ष देण्याची गरज आहे.संयुक्त पाहणी नाहीगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध विभागाची संयुक्त बैठक घेतली नाही. तसेच शांतता समित्यांच्या बैठकाही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीतच झाल्या. प्रशासन याबाबत गंभीर नसल्याने ऐनवेळी धांदल उडण्याची शक्यता आहे. शहरातील दोन रस्त्यांच्या कामांच्या निविदा अंतिम झाल्या. मात्र पावसामुळे कार्यारंभ आदेश दिले नाहीत. यात मेडिकल लाईन ते ग्रामीण पोलिस ठाणे, चौधरी चौक, मारवाडी गल्ली, तलाबकट्टा, कपडा गल्ली ते म.गांधी पुतळ्यापर्यंतचे एक काम आहे. तर दुसरे काम लोकमत कार्यालयापासून गायत्री भवनापर्यंतच्या रस्त्याचे आहे. लवकरच याचे कार्यारंभ आदेश देण्यात येणार असल्याचे माजी नगराध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी सांगितले.
उत्सवाच्या तोंडावरही रस्त्यांची दैना कायम
By admin | Updated: September 2, 2014 23:59 IST