उस्मानाबाद : विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन सहा दिवस झाले. मात्र, बहुतांश शासकीय कार्यालयातील उद्घाटन, भूमिपूजनाच्या कोनशिला उघड्याच ठेवण्यात आल्या आहेत. हा आचारसंहितेचा भंग असताना देखील संबंधित कार्यालय प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्षच आहे.जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी शनिवारी निवडणुकीशी संबंधित अधिकारी, राजकीय नेते यांची बैठक घेऊन आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सक्त निर्देश दिले आहेत. त्याच अनुषंगाने बुधवारी शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, बसस्थानक आदी ठिकाणी जाऊन पाहणी करण्यात आली. यावेळी बहुतांश कार्यालयातील कोनशिला झाकल्याचे दिसून आले. मात्र, जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत, शहर पोलिस ठाणे आदी शासकीय कार्यालयांच्या इमारतीतील व परिसरातील कोनशिला उघडयाच असल्याचे दिसून आले. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटनांची कोनशिला तसेच जिल्हा परिषद परिसरातील उपमुख्यमंत्री नावाची कोनशिला उघडीच असल्याचे दिसले. महावितरण कार्यालयाच्या भिंतीवरही राजकीय लोकांचे अर्धवट पोस्टर झळकत होते. आचारसंहितेपूर्वी उद्घाटन व भूमिपूजनाचे कार्यक्रम जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झाले होते. त्या भूमिपूजन व उद्घाटन कोनशिलाही उघडयाच आहेत. उस्मानाबाद शहरातील पोलिस ठाण्यात भिंतीवर नागरी हक्क संरक्षण कायद्याचे राजकीय नेत्याचे पोस्टर आहे. याशिवाय जिल्ह्यात इतरही ठिकाणी आमदार, खासदार निधीतून जी रस्त्यांची कामे झाली आहेत, तेथील फलकही ‘जैसे थे’ असल्याचे दिसून आले.जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगर पालिका, उपविभागीय कार्यालय, एस.टी. वरच्या जाहिराती, कृषी कार्यालय येथील कार्यालय प्रमुखांनी खबरदारी घेऊन आचारसंहिता लागू होताच फलक झाकले आहेत. मात्र मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेच्या आवारातील काही कोनशिला झाकण्यात आल्या असल्या तरी इमारतीच्या मागील बाजूस असलेली कोनशिला उघडी असल्याचे दिसले. ..तर शिस्तभंगाची कारवाई होणार४आचार संहिता लागल्या दिवशी सर्वच शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन राजकीय लोकांचे फोटो झाकण्यास सांगण्यात आले होेते. जर कुठल्या शासकीय कार्यालयात कोनशिला उघडया असतील तर संबधित अधिकाऱ्याविरुध्द शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे उस्मानाबाद उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी सांगितले.
आचारसंहिता जारी; अनेक कोनशिला उघड्याच
By admin | Updated: September 18, 2014 00:39 IST