नजीर शेख , औरंगाबादकेंद्रात आता आमचे सरकार असून मराठवाड्यातील तरुणांसाठी विविध योजना आणून दाखवू, असा निर्धार व्यक्त करत पदवीधरांसाठी समान पदवी, समान वेतन धोरण असायला हवे, असा मुद्दा भाजपाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शिरीष बोराळकर यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत मांडला. पदवीधरांसाठी आपण कोणते काम केले की, ज्यासाठी त्यांनी आपणाला मतदान करावे, यासंदर्भात बोराळकर म्हणाले की, मी विविध उद्योगांत दीड हजारांवर युवकांना नोकरीला लावले आहे. अनेकांना उद्योगासाठी मदत केली आहे. मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी केंद्राच्या योजना आणण्याचा माझा प्रयत्न राहील. मी खेळाडू असून खेळाडूंना जागतिक स्तरावर संधी मिळणे तसेच राष्ट्रीय स्तरावरील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे. पदवीधरांमध्ये सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, अभियंते, शिक्षक, प्राध्यापक, सरकारी नोकरदार अशा विविध घटकांचा समावेश होतो. या सगळ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानावर आधारित धोरण असायला हवे, यासाठी माझा प्रयत्न राहील. मागास विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत पाच लाख रुपयांपर्यंत झाली पाहिजे, तसेच पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ व्हायला हवी. मी गुत्तेदार नाही. त्यामुळे विधान परिषदेत पदवीधरांचे प्रश्न तीव्रतेने मांडेन, असे सांगत मोदींची लाट आणि मुंडे यांच्याविषयीची सहानुभूती या दोन्हींचा निश्चितच फायदा होईल, असे मत भाजपाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवार शिरीष बोराळकर यांनी व्यक्त केले. गेल्या वेळी शिवसेनेचे उमेदवार राजू वैद्य यांच्यामुळे भाजपाचा पराभव झाला. त्यांना १७ हजार मते मिळाली आणि आमचा तीन हजार मतांनी पराभव झाला. यंदा तर शिवसेना कधी नव्हे एवढी माझ्यासोबत आहे. तालुक्या-तालुक्यांतून शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते बैठका घेत आहेत. हा आमचाच बालेकिल्ला आहे, असा दावा बोराळकर यांनी केला. आपली उमेदवारी जाहीर होण्यास उशीर झाला. शिवाय आपण सतीश चव्हाण यांच्या विरोधात लढण्यास तयार झाले. श्रीकांत जोशी तयार झाले नाहीत, या पार्श्वभूमीवर आपण निवडणुकीत उतरला हे धाडसच म्हणावे लागेल, या प्रश्नावर बोराळकर यांनी वातावरण खूपच चांगले असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार लाखांवर मतांनी निवडून आले आहेत. हा जो नवमतदार आहे तो आमच्याकडे आहे. पंतप्रधान मोदींच्या वलयाचा हा परिणाम असून त्याचा फायदा आम्हाला मिळू शकेल, असे स्पष्ट केले. भाजपाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांचे मत दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूचे पडसाद निवडणुकीवर परिणाम करू शकतील का, या प्रश्नावर बोराळकर यांनी केवळ चर्चेच्या वावटळीचा काही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले. मुंडेसाहेबांनंतर आ. पंकजा मुंडे-पालवे यांनी मराठवाड्याचे नेतृत्व करावे, असे माझे मत आहे. त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळावे, कमी वयात त्या खूप परिपक्व नेत्या बनल्या आहेत. त्यांना केंद्रात मंत्रिपद दिल्यास हे नेतृत्व आणखी पुढे जाईल, असे मला वाटते.
समान पदवी, समान वेतन धोरण हवे
By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST