औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेरीस शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी ३४ हजार मतांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीअखेरीस भाजपा महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर प्रचंड मागे पडले होते. गुरुवारी सकाळी ८ वाजता चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली. दुपारी २ वाजता पहिल्या फेरीची मते मोजण्यास सुरुवात झाली. रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला. पहिल्या फेरीत चव्हाण यांना २७ हजार २५० मते मिळाली, तर बोराळकर यांना ११२७२ मते मिळाली. सिद्धेश्वर मुंडे यांना २५०६, रमेश पोकळे यांना ३४७८ मते मिळाली. चव्हाण यांना पहिल्या फेरीअंतीच बोराळकर यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली.
महाविकास आघाडीचे उमेदवार चव्हाण आणि महायुतीचे उमेदवार बोराळकर यांच्यात मुख्य लढत असली तरी दुसऱ्या फेरीअंतीच चव्हाणांची विजयाकडे घौडदौड दिसून आली. दोन फेऱ्यांचे मिळून अंदाजे १ लाख १३ हजार मतमोजणी झाली.
निवडणुकीत विक्रमी मतदान झाले असून, मतमोजणी प्रक्रियाही संथ गतीने सुरू असल्याने निकाल येण्यास विलंब होतो आहे. निवडणूक निर्णय अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी रात्री ९ वाजता पहिल्या फेरीची घोषणा केली. त्यात त्यांनी १०७३ टपाली मतांची मोजणी झाल्याचे सांगितले. त्यात चव्हाण यांना ६०० तर बोराळकर यांना २८६ मते मिळाली.
सकाळी ८ वाजता मराठवाडा रिअल्टर्स येथे मतमोजणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मतपत्रिका मतपेट्यांमधून बाहेर काढणे, २५-२५ मतांचे गठ्ठे करणे, मिक्स करून मतपत्रिका मोजण्यासाठी ५६ टेबलवर देण्यासाठी दुपारचे ४ वाजले. त्यानंतर टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरू झाली, १२४८ टपाली मतदानापैकी १०७३ मतपत्रिका वैध तर १७५ मतपत्रिका अवैध ठरल्या. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना ६०० तर महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना २८६ मते पडली.
५ हजार ४१० अवैध मते
पहिल्या फेरीत टपाली मतांसह वैध ५० हजार ६२० मतांची मोजणी झाली होती. टपालीसह ५७ हजार ७४ मतांची मोजणी झाली. त्यात ५ हजार ४१० मते बाद ठरविण्यात आली. या मतपत्रिकांवर चुकीचे पसंती क्रमांक टाकणे, सह्या करणे, मराठा आरक्षण मागणी, अनुदान मागणीचा उल्लेख करण्यात आला होता.
भाजप नेत्यांचा काढता पाय
पहिल्या फेरीची मतमोजणी जाहीर होण्यापूर्वीच भाजपच्या नेत्यांनी मतमोजणी केंद्रातून काढता पाय घेतला. भाजपचे उमेदवार बोराळकर, खा. भागवत कराड, आ. अतुल सावे, विजय औताडे आदींनी मतमोजणी केंद्र सोडले. संजय केणेकर आणि प्रमोद राठोड हे तिसऱ्या फेरीच्या मतमोजणीपर्यंत केंद्रात होते.