वाळूज महानगर : रांजणगाव शेणपुंजी येथे मुख्य रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.रांजणगाव फाटा, कमळापूर रोड, आंबेडकर चौक इ. ठिकाणी मुख्य रस्त्यावर फळ विक्रेते, हॉटेलचालक, भाजीपाला विक्रेते, तसेच विविध व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे.अनेक व्यावसायिकांनी मुख्य रस्त्यावरच व्यवसाय थाटल्यामुळे वाहनधारक व नागरिकांना सतत वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागत आहे. या वाढत्या अतिक्रमणामुळे शाळेत ये-जा करणारे विद्यार्थी, कामगार व पादचाऱ्यांना जीव मुठीत धरूनच ये-जा करावी लागत आहे. सतत वाहतुकीची कोंडी होत असल्यामुळे छोट्या- मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढतच चालले आहे. मध्यंतरी ग्रामपंचायतीच्या वतीने रस्त्यावर अतिक्रमणे करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली होती. मात्र, या मोहिमेत सातत्य नसल्यामुळे तसेच अतिक्रमणधारकही ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्यामुळे अतिक्रमणाचा विळखा वाढतच चालला आहे. मुख्य रस्त्यावर अतिक्रमण करून तसेच वाहतुकीची कोंडी करणाऱ्या व्यावसायिकांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी त्रस्त वाहनधारक व नागरिकांतून होतआहे.
व्यावसायिकांचे मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण
By admin | Updated: September 24, 2014 01:05 IST