परळी: शहरातील उड्डाणपूल ते इटके चौक दरम्यानच्या फुटपाथवर अतिक्रमणे वाढली आहेत. नादुरुस्त टँकरही या ठिकाणी आणून ठेवण्यात आला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्चून बांधलेल्या फुटपाथचा जनतेसाठी काय उपयोग, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. इटके चौक ते उड्डाणपूलच्या रस्त्यावर चक्क टँकर वाहन तळच झाले असे वाटू लागले.या भागातील माजीनगरसेवक सचिन कागदे म्हणाले की, इटके चौक, उड्डाणपूल या मार्गावरुन शक्ती कुंज वसाहतीतील न्यू हायस्कूल, भेल स्कूल, विद्यावर्धिनी या शाळेत दररोज तीन हजार विद्यार्थी येतात आणि जातात. काही अॉटोरिक्षा काही स्कूल बस तर काही सायकलवर विद्यार्थी ये-जा करतात. परंतु या मार्गावरील वाहतूक व्यवस्था सकाळी व दुपारी पूर्णत: कोलमडलेली असते. भर रस्त्यावरुन राखेचे टँकर, रेतीचे ट्रक, लोखंड घेऊन जाणारे ट्रक थांबलेले असतात, ही परिस्थिती आहे. शामाप्रसाद मुखर्जी, उड्डापूल ते इटके चौक दरम्यानच्या मार्गावर सा. बां. ने नाली व त्यावर फुटपाथ बांधले. यावर अक्षरश: कटिंगची दुकाने, गॅरेजची दुकाने थाटली आहेत. फुटपाथवरच टँकरच लावण्यात आला आहे. त्यामुळे फुटपाथवरुन पादचाऱ्यांना जाताच येत नाही, अशी तक्रार सचिन कागदे यांनी केली.पोलिसांची बघ्यांची भूमिकाउड्डाणपूल ते इटकेचौक रस्त्यावरच जड वाहने असतात. ते वाहतुकीस अडथळा ठरतात. हे तेथून पेट्रोलिंग करणाऱ्या वाहतूक शाखेच्या पोलिसांना दिसत नाही का मुद्दाम कानाडोळा केला जातो, असा आरोपही कागदे यांनी केला आहे. (वार्ताहर)कारवाई चालूच ! रस्त्यावरील वाहने हटवूशहरातील रस्त्यांवरील वाहने दररोज शहर पोलिस पेट्रोलिंग दरम्यान हटवितातच. याशिवाय उड्डाणपूल ते ईटके चौकातच ही कारवाई चालूच आहेत, जी वाहने रस्त्यावर दिसतील ती हटवू, असे परळीचे पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सांगितले.फुटपाथ रस्त्यावरील अतिक्रमणे काढावेइटके चौक ते उड्डाणपूल दरम्यानच्या फुटपाथवरील अतिक्रमणे संबंधितांनी काढून घ्यावीत, असे आवाहन सा.बां. उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता अशोक गांजुरे यांनी केले आहे.
परळीच्या फुटपाथलाही अतिक्रमणाचा विळखा
By admin | Updated: June 23, 2014 23:51 IST