औरंगाबाद : गारखेडा परिसरातील डॉ. हेडगेवार रुग्णालयात कार्यरत असलेले सुमारे २८० कर्मचारी आज गुरुवारपासून पगारवाढीच्या मागणीसाठी संपावर गेले आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीच शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतीय मजदूर संघाची तेथे युनियन आहे. या युनियननेच हा संप घडवून आणल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.डॉ. हेडगेवार रुग्णालय सुमारे २० वर्षांपासून शहरात कार्यरत आहे. या रुग्णालयात स्टाफ नर्स, ब्रदर, आॅपरेशन थिएटर असिस्टंट, लॅब असिस्टंट, मेडिकल स्टोअर असिस्टंट, औषध निर्माता, सफाईगार, असे सुमारे २८० कर्मचारी कायम आहेत. या कर्मचाऱ्यांनी चार वर्षांपूर्वी भारतीय मजदूर संघाची युनियन तेथे लागू केली आहे. तीन वर्षांपूर्वी रुग्णालय व्यवस्थापन आणि युनियनसोबत केलेला करार एप्रिल महिन्यात संपला. संघटनेचे पदाधिकारी श्रीपाद कुटासकर आणि गणेश भोसले यांनी सांगितले की, रुग्णालयाकडून १५ ते २० वर्षे कामाचा अनुभव असलेल्या जुन्या कर्मचाऱ्यांना जितके वेतन मिळते, तितकेच वेतन कंत्राटी कामगारांना रुग्णालयाकडून दिले जाते. वाढत्या महागाईमुळे केवळ आठ ते नऊ हजार रुपये वेतनावर काम करणे कर्मचाऱ्यांना परवडत नाही. कर्मचाऱ्यांना पहिल्या वर्षी पाच हजार, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी दोन हजार रुपयांची वाढ द्यावी अथवा पहिल्या वर्षी पाच हजार, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी प्रत्येकी एक हजार रुपये आणि महागाई भत्ता देण्याची मागणी केली. व्यवस्थापनाने केवळ ३७०० रुपये वाढ देऊ केली आहे. व्यवस्थापनासोबत आमच्या २० बैठका झाल्या, तसेच कामगार कल्याण आयुक्तांकडेही चार बैठका झाल्या आहेत. मात्र, या बैठकांमध्येही कोणतीही तडजोड न झाल्याने संघटनेने आजपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. संपाची नोटीस युनियनने २१ दिवस आधीच दिल्याचे कुटासकर यांनी सांगितले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व प्रमोद जावळे, विठ्ठल पाटील, संतोष गव्हाळे, चंद्रप्रकाश जमदडे, गोटीराम खांडेकर, चिमाजी मधे, शैलेश देव, तात्यासाहेब गायकवाड, विजय बिनोरकर, बालाजी वडजे, दीपा पैठणकर, संजय वंजारे, विजय पवार, संदीप महाळणकर, देवीदास पवार आदी करीत आहेत.अॅडमिशन बंद, केवळ ओपीडी सुरूयुनियनसोबत आम्ही २७ वेळा चर्चा केली. मात्र, त्यांच्या मागण्या अवास्तव असून, त्या जर मान्य केल्या तर हॉस्पिटल बंद पडल्याशिवाय राहणार नाही. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत त्यांच्याशी चर्चा केली. मात्र, युनियनचे नेते ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. त्यांच्या संपकाळात आम्ही कंत्राटी कामगारांकडून काम करून घेत आहोत. संप समाप्त होईपर्यंत अॅडमिशन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे संचालक डॉ. अनंत पंढेरे यांनी सांगितले. ते म्हणाले की, सध्या केवळ बाह्यरु ग्ण विभागातच रुग्णांची तपासणी करीत आहोत. रोज सुमारे ५० ते ६० डेंग्यूचे रुग्ण येतात. मात्र, त्यांनाही अॅडमिट करता आले नाही.
हेडगेवारमधील कर्मचारी संपावर
By admin | Updated: August 22, 2014 00:20 IST