औरंगाबाद : आजची तरुणाई निव्वळ सोशल मीडिया आणि व्हाॅट्सॲपवर अवलंबून असल्याचा अनेकांचा समज आहे. मात्र, उर्दूतील काही नवोदित लेखकांनी शुक्रवारी रात्री झालेल्या एका मुशायऱ्यात उर्दू साहित्यिकांना अचंबित केले.
औरंगाबाद शहराच्या इतिहासात प्रथमच नवोदित लेखकांसाठी मुशायरा लेबर कॉलनी येथील शाही मशीदजवळ आयोजित करण्यात आला होता.
‘एक शाम अहले कलम के नाम विषय पर’ असे कार्यक्रमाला नाव देण्यात आले होते. अंजुमन अहले कलमच्या अध्यक्षा फिरदास फातेमा रमजानी खान यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील सलीम मोहीयोद्दीन उपस्थित होते. प्राचार्य डॉक्टर मगदूम फारूकी, विख्यात लेखक तथा कवी नुरूलहसनैन, दिल्ली येथील शफी अहमद, असलम मिर्जा, डाॅ. अजीम राही, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उर्दू विभागप्रमुख कीर्ती मालिनी जावळे, अबुबकर रहेबर, ॲड. श्रीनिवास सोळुंके, फेरोज पठाण, डॉ. काजी नवीद, इलियास किरमानी, गजनफर जावेद, मोहसीन अहेमद, फव्वाद खान यांची उपस्थिती होती. दिल्ली येथील प्रा. अनवर पाशा यांनी दीपप्रज्वलन केले. युवा शायर असरार दानिश, अब्दुल अजीम, मुहम्मद बिलाल अनवर, साद मलिक साद, अशर काशिफ, मुसाब प्यारे, सबा तहसीन, आदील राही, अब्दुल अहद शाहेद, अजआन खान यांनी एकापेक्षा एक सरस साहित्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. नवोदित लेखकांचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले.