उस्मानाबाद : येथील वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयात दोघा कर्मचाऱ्यांनी गोंधळ घातल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. या प्रकारामुळे कार्यालयातील कामकाज काहीकाळ ठप्प झाले. यानंतर महसूल प्रशासनाच्या वतीने या घटनेचा पंचनामा करून गोंधळ घालणाऱ्या या दोन्ही कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. याबाबत मिळालेली माहिती अशी, उस्मानाबाद शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय आहे. शनिवारी या कार्यालयात जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार स्वच्छता अभियान राबविण्यात येते होते. यासाठी कार्यालयातील भंगार साहित्य बाहेर काढणे तसेच कागदपत्रे व्यवस्थित लावण्याचे काम सुरू होते. यावेळी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आय. एस. कऱ्हाळे व वाहनचालक हनमंत सातपुते हे दोघे कार्यालयात दाखल झाले. त्यांनी ‘स्वच्छता अभियानाचे काम आम्ही का करावे, तुम्ही आम्हाला रजाही देत नाही’, असे म्हणत कार्यालयीन प्रमुखांना कर्मचाऱ्यासमोर अर्वाच्च भाषा वापरल्याचे कळते.दरम्यान, कार्यालयातील वरिष्ठ भूवैज्ञानिकानी हा प्रकार दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांच्या कानावर घातला. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागाचे नायब तहसीलदार वाघमारे व अन्य दोन कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊन घडल्या प्रकाराचा पंचनामा केला. यावेळी वाहनचालक सातपुते हे तेथून पसार झाले. दरम्यान, या दोघांचीही वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ भूवैज्ञानिक रेड्डी यांनी सांगितले. या घटनेची शनिवारी शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)
भूवैज्ञानिक कार्यालयात कर्मचाऱ्यांचा गोंधळ
By admin | Updated: November 30, 2014 00:55 IST