जालना : शहरात वीज चोरी रोखण्यासाठी तसेच रस्त्यावरील तारांचे जाळे कमी करण्यासाठी महावितरणने शहरातील विविध मार्गांवर भूमिगत केबल्स अंथरण्याची योजना आखली आहे. वीज चोरी होत असलेल्या भागात इन्सुलेटर्स केबल लावण्यात येत आहे. मात्र, दोन्ही कामे संथगतीने होत असल्याने वीजचोरीचे प्रमाण वाढत आहे. याकडे महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. एपीडीआरपी या योजनेतून शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक मार्ग तसेच वर्दळीच्या मार्गावर भूमिगत केबल अंथारण्यात येत आहे. तसेच इन्सुलेटर्स केबल टाकण्यासाठी कोट्यवधी रूपयांचे नियोजन करण्यात आले आहे. कन्हैयानगर, दु:खीनगर, नूतन वसाहत, लालबाग आदी परिसरातील काही भागांत इन्सुलेट केबल टाकण्यात आले आहे. मात्र, बहुतांश भागात अद्यापही ही केबल अंथरण्यात आलेली नाही. याचा फायदा काही वीजचोर घेत आहेत. नूतन वसाहत, चंदनझिरा, कन्हैयानगर, सुंदरनगर, लालबाग, रामनगर, गांधीनगर, संजय नगर, इंदिरानगर आदी भागात मोठ्या प्रमाणात वीजचोरी सुरू आहे. या वीजचोरीकडे महावितरणचे दुर्लक्ष होत आहे.साधारणपणे दिवसाकाठी ५ हजार युनिटपेक्षा जास्त वीजचोरी होत असल्याचा अंदाज महावितणचे अधिकारी व्यक्त करीत आहेत. पाच हजार युनिटमधून महावितरणचे दिवसाकाठी लाखो तर महिन्याकाठी कोट्यवधी रूपयांचे नुकसान होत आहे. ३०० युनिटपर्यंत ७ रूपये २१ पैसे प्रति युनिट तर ३०० ते ५०० युनिटपर्यंत ९.९५ रूपये, ५०१ ते १ हजार युनिटपर्यंत ११. ३१ रूपये तर १००० युनिटच्या पुढे १२.५ रूपये दर महावितरणकडून वसूल केले जातात.जालना शहरातील विविध भागात आकडे टाकून वीज चोरी वाढली आहे. विशेष म्हणजे चोवीस तास वीज चोरी होत असली तरी या प्रकाराकडे महाविरणचे दुर्लक्ष होत आहे. शहरातील नूतन वसाहत परिसरात रविवारी टिपलेले छायाचित्र.
शहरात वीजचोरी वाढली!
By admin | Updated: July 25, 2016 00:36 IST