वाळूज महानगर : वाळूज परिसरात महावितरणच्या सावळागोंधळामुळे नागरिक त्रस्त झाले असून, घाणेगावात मोलमजुरी करणाऱ्या एका ग्राहकाला तब्बल दोन लाखांचे बिल बजावण्यात आले आहे. घराच्या किमतीपेक्षा वीजबिलच जास्त असल्यामुळे हा ग्राहक अडचणीत सापडला आहे.वाळूज सब-स्टेशनअंतर्गत येणाऱ्या रांजणगाव, घाणेगाव, जोगेश्वरी, कमळापूर, वाळूज, नारायणपूर इ. परिसरातील घरगुती वीज ग्राहकांना महावितरणच्या गलथान कारभारामुळे मनस्ताप होत आहे. तीन महिन्यांपासून परिसरात फोटो मीटर रीडिंगप्रमाणे बिल न देता भरमसाठ देयके ग्राहकांच्या माथी मारली जात आहेत. रीडिंग घेणाऱ्या खाजगी एजन्सीचे कर्मचारी घरोघरी जाऊन रीडिंग न घेता अंदाजे बिले वाटप करीत असतात. सदोष बिलांच्या दुरुस्तीसाठी या परिसरातील ग्राहकांना महावितरणच्या गंगापूर व वाळूज कार्यालयात हेलपाटे घालावे लागत आहेत. बिले दुरुस्त करून देण्याऐवजी महावितरणचे अधिकारी वेळकाढू धोरण अवलंबत आहेत. यामुळे ग्राहकांकडील थकबाकीचा आकडा फुगत चालला आहे. बिलाचा भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी देतात.महावितरणच्या विरोधात आंदोलनाचा इशारामहावितरणकडून वाळूज परिसरात सर्वसामान्य ग्राहकांची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. ही लूट थांबविण्यात यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टी युथ फोर्सचे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद तावडे, जिल्हाध्यक्ष सागर कुलकर्णी आदींसह त्रस्त वीज ग्राहकांनी दिला आहे.अहो आश्चर्यम्...!घाणेगाव येथील दीपक कुंडलिक नवघरे या ग्राहकाला २ लाख २ हजार ६१० रुपयांचे बिल आले आहे. आपले घर झोपडीवजा असून, कमी विजेचा वापर असूनही एवढे बिल कसे आले, असा प्रश्न या ग्राहकाला पडला आहे. बिलाएवढी आपल्या घराची किंमतही नसल्याचा दावा या ग्राहकाने केला आहे. घर विक्री करूनही बिल भरणे शक्य नसल्याचे या ग्राहकाचे म्हणणे आहे.
मजुराला २ लाखांचे वीज बिल
By admin | Updated: June 2, 2016 23:47 IST