लातूर : महाविद्यालयीन विद्यार्थी संसदेच्या निवडणुका लोकशाही पद्धतीनेच घेण्यात याव्यात़ या निवडणुकांमुळे नेतृत्व विकसीत होऊन राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात चमकेल़ सध्याच्या विद्यार्थी संसदेची निवडणूक व वर्गप्रतिनिधींची निवड अयोग्य असून, निवडणुकीनेच ही संसद निवडली गेली पाहिजे, असे मत ५८ टक्के विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे़ ४२ टक्के विद्यार्थ्यांनी जुन्या पद्धतीने म्हणजे गुणवत्तेनुसार संसदेच्या निवडणुकीला पसंती दिली आहे़ महाविद्यालयातील विद्यार्थी संसदेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी नुकताच दुजोरा दिला आहे़ या अनुषंगाने लोकमतने सर्व्हेक्षणाद्वारे विद्यार्थी, प्राध्यापक व प्राचार्यांचे मत घेतले असता, ५८ टक्के विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीने महाविद्यालयातल्या विद्यार्थी संसदेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत, असे मत नोंदविले आहे़ केवळ ४२ टक्के विद्यार्थ्यांनी जुन्या पद्धतीने म्हणजे गुणवत्तेनुसार महाविद्यालयातील विद्यार्थी संसद व वर्गप्रतिनिधींची निवड केली जावी, असे मते व्यक्त केले आहे़ लोकशाही पद्धतीने निवडणूक झाल्यास पक्षीय राजकारण होऊन तंटे होण्याची भितीही विद्यार्थ्यांत आहे़ ५८ टक्के विद्यार्थ्यांनी तंटे होण्याची भिती व्यक्त केली़ परंतू निवडणुका लोकशाही पद्धतीनेच झाल्या पाहिजेत, याला दुजोरा दिला आहे़ विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीमुळे नेतृत्व विकसीत होण्याला वाव असल्याचे ६२ टक्के विद्यार्थ्यांचे मत आहे़ शिवाय, गुणवत्तेनुसार वर्गप्रतिनिधींची निवड होत असल्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची मांडणी प्राचार्य, कुलगुरुंकडे होऊ शकत नाही़ गुणवंत विद्यार्थी प्राचार्य, प्राध्यापकांच्या मर्जीत राहतो़ न्याय मागण्यांसाठी विरोधाची भूमिका गुणवंतातून निवडलेल्या संसदेकडून होऊ शकत नाही़ विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकशाही प्रक्रियाच न्याय देऊ शकते, असे ५८ टक्के विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे़ लोकमत’ने लातूर शहरातील विविध महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांचे म्हणणे सर्व्हेक्षणाद्वारे जाणून घेतले असता, हे मत समोर आले आहे़ प्राध्यापक व प्राचार्यांनी मात्र दोन्ही बाजूंचा विचार केला असून, महाविद्यालयीन विद्यार्थी संसदेच्या निवडणुकीत सार्वजनिक स्वरुप येते़ त्यामुळे पक्षीय राजकारण महाविद्यालयात फोपावून विद्यार्थ्यांचे गट-तट निर्माण होतात़ ही दरी महाविद्यालय सोडेपर्यंत त्या गटात राहते़ हा पूर्वअनुभव असल्याचे प्राचार्य, प्राध्यापकांचे म्हणणे आहे़ गुणवंतातून निवडलेल्या संसदेतूनही चांगले लोकप्रतिनिधी तयार होऊ शकतात़ यावर काही प्राचार्यांचा व प्राध्यापकांचा विश्वास आहे़ विद्यार्थ्यांनी मात्र लोकशाही प्रणालीद्वारेच संसदेच्या निवडणुकीला पसंदी दिली आहे़ लोकशाही पद्धतीने विद्यार्थी संसदेच्या निवडणुका घेण्यास हरकत नाही़ परंतू मागचा अनुभव पाहता या निवडणुकांना सार्वजनिक स्वरुप येते़ विद्यार्थी गटातटात विभागले जातात़ निवडणुकीमुळे ११ वीला झालेले मतभेद पदव्युत्तर पदवी पर्यंत राहतात़ ही भिती आहे़ महाविद्यालयीन जीवन हे सळसळते रक्त आहे़ या उसळत्या रक्ताला महाविद्यालय प्रशासनाकडून रोखणे अवघडच आहे़ त्यामुळे जुनी पद्धतच योग्य आहे़ गुणवंत विद्यार्थी संसदेच्या अनुभवावरुन राजकारणात जाऊन लोकशाहीला बळकट करु शकतील़ त्यामुळे जुनी पद्धतच प्राचार्य म्हणून योग्य वाटते, असे मत प्रा़ डॉ़ बाबासाहेब गोरे यांनी व्यक्त केले़ लोकशाही पद्धतीने यापूर्वी निवडणुका होत होत्या़ मात्र तंटे झाले, अनेक विद्यार्थ्यांचा निवडणुकीच्या राजकारणात खून झाल्याचे उदाहरणे आहेत़ त्यामुळे शासनाने ही पद्धत बंद करुन गुणवत्तेनुसार महाविद्यालयाची विद्यार्थी संसद केली़ भांडण-तंट्यांची समस्या यात आहे़ ही समस्या वगळता लोकशाही पद्धतीने निवडणुका घेण्यास काहीच हरकत नाही, परंतू वातावरण निर्मिती करावी लागेल, असे प्रा़डॉ़एस़पीग़ायकवाड म्हणाले़लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्यामुळे महाविद्यालय स्तरावर नेतृत्व विकसीत होऊन देशाच्या व राज्याच्या राजकारणात येईल़ त्यामुळे महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी संसदेच्या निवडणुका झाल्या पाहिजेत़ निवडणुकीत हुशार तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवता येईल़ या निवडणुकीमुळे काही समस्या निर्माण होऊ शकतात़ परंतू त्या दीर्घकाळ राहत नाहीत़ समज आल्यानंतर झालेले मतभेद विद्यार्थी विसरतील, असे प्रा़ बळवंत सूर्यवंशी म्हणाले़