बीड : २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना अंशदायी पेन्शन योजना रद्द करून सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागणीसह इतर २३ मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध विभागातील १८ हजार कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एक दिवसीय संप केला. शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट असल्याचे चित्र पहावयास मिळाले.सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातवा वेतन आयोग त्वरित गठीत करून मागील १ जानेवारी २०१६ पासून लागू करावा, कंत्राटी नियुक्त्या रद्द करून आशा कर्मचाऱ्यांना तसेच अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी नियुक्त्या द्याव्यात यासह विविध मागण्या राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने लावून धरल्या आहेत. मागील दोन ते तीन वर्षांपासून संघटनेच्या माध्यमातून कर्मचारी आंदोलन करत आहेत; परंतु सरकार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे शासकीय कर्मचाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. महादेव चौरे, सुहास हजारे, सचिन गायकवाड, कपिल पाटील, बालाजी कचरे, सुनील आखाडे, दत्ता चौधरी, परमेश्वर चाफाकानडे, पी.व्ही. देशपांडे, रविकिरण निर्मळ, प्रसाद निर्मळ, विकास कोरडे, श्रीनिवास मुळे, सुजित पारवे, राहुल कसबे, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग नोंदवला होता. (प्रतिनिधी)
अठरा हजार कर्मचारी संपावर
By admin | Updated: September 3, 2016 00:30 IST