बीड : शिक्षण बचाव समितीने विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या शैक्षणिक बंदला बुधवारी प्रतिसाद मिळाला. माध्यमिक व प्राथमिक मिळून पाचशेवर शाळा बंद राहिल्या. गुरुवारी देखील बंदचे आवाहन केले आहे.शिक्षक व शिक्षणसंस्थांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षण बचाव कृती समितीचा लढा सुरु आहे. खासगी माध्यमिक विभागाच्या चारशेहून अधिक तर प्राथमिक विभागाच्या सव्वाशेपेक्षा जास्त शाळा सकाळपासूनच बंद होत्या. दरम्यान, बहुतांश शाळांमधून विद्यार्थ्यांना आल्यापावली परतावे लागले. काही पालकांचीही धांदल उडाली. काही शाळांनी नोटीस फलकावर बुधवार व गुरुवारी शाळा बंद ठेवली जाणार असल्याचे ठळक अक्षरात लिहिले होते. बहुतांश ठिकाणी शाळा स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष दीपक घुमरे यांनी सांगितले. प्रशासनाने संस्थाचालक, शिक्षकांच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन प्रा. सुशीला मोराळे, उत्तमराव पवार, डी. जी. तांदळे, कल्याण वाघमारे, प्रा. सत्येंद्र पाटील, गोविंद वाघ, प्रशांत पवार, राजकुमार कदम, कमलाकर दुधाळ, इरफान सिद्धीकी यांनी केले. (प्रतिनिधी)२८ आॅगस्ट २०१५ रोजीचा संचमान्यतेचा शासननिर्णय रद्द करावा, शिक्षण संस्थांचे अधिकार कायम ठेवावेत, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नवीन अहवालाची शिफारस मान्य करावी, शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शाळाबाह्य कामे देऊ नयेत, कनिष्ठ महाविद्यालयीन तसेच केंद्रीय आश्रमशाळांना अनुदान द्यावे, शालेय पोषण आहार योजना स्वतंत्रपणे राबवावी, कला- क्रीडा शिक्षक नियुक्ती पूर्णवेळ करावी आदी मागण्यांसाठी शैक्षणिक बंद पुकारला.
शैक्षणिक बंदला प्रतिसाद
By admin | Updated: December 9, 2015 23:56 IST