सुनील कच्छवे ,औरंगाबादराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणाऱ्या १३० कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने अचानक ‘अर्धवेळ’ ठरविले आहे. आठ महिने सेवा बजावल्यानंतर आणि त्यातील सहा महिन्यांचा पूर्ण पगार दिल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाला वरील साक्षात्कार झाला. परिणामी अर्धाच पगार हाती पडल्यामुळे हे कर्मचारी अडचणीत आले आहेत. दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महापालिका आयुक्त प्रकाश महाजन यांनी त्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत महानगरपालिकेत गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात १३० आरोग्य कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर भरती करण्यात आली. यामध्ये यामध्ये ७८ एएनएम, १४ फार्मासिस्ट, १४ लॅब टेक्निशियन आणि २६ परिचारिकांचा समावेश आहे. मनपाला या कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरमहा अनुदान मिळते. आॅक्टोबरपासून मार्च महिन्यापर्यंत या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या वेळी ठरल्याप्रमाणे पगार मिळत गेला. त्यानंतर एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचा पगार मात्र वेळेवर झाला नाही. मनपाच्या आरोग्य विभागाने पगार थकविल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून हे कर्मचारी मनपात चकरा मारत होते. त्यांनी मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी यांच्यासह मनपाच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेतली. त्यानंतर मनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. कुलकर्णी यांनी या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या फाईलवर सही केली. परंतु कर्मचाऱ्यांच्या हातात पगार पडला तेव्हा त्यांना आनंद होण्याऐवजी धक्काच बसला. आरोग्य विभागाने या कर्मचाऱ्यांना अचानक अर्धवेळ ठरवीत त्यांना मागील तीन महिन्यांचा निम्माच पगार दिला आहे. त्यामुळे हादरलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी पुन्हा मनपात येऊन अधिकारी-पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तुम्ही अर्धवेळ कामावर होता असे गृहित धरून तुमचे पगार काढण्यात आले आहेत, असे त्यांना आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु पूर्णवेळ नियुक्ती असताना अर्धवेळ कसे ठरवता असा सवाल या कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांकडे केला.मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांचीही संबंधित आरोग्य कर्मचाऱ्यांनी नुकतीच भेट घेतली. कर्मचाऱ्यांनी संपूर्ण प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ४त्यानंतर यामध्ये गडबड झाल्याचे लक्षात येताच मनपा आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. लवकरच आयुक्तांना या प्रकरणाचा अहवाल सादर होणार आहे.शहरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ भरती करण्यात आलेली आहे. मात्र त्यांच्या निम्माच पगार मंजूर करण्यात आला आहे. मी अतिरिक्त पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांच्या पगाराची फाईल मंजूर झालेली आहे. त्यामुळे असे का घडले हे मला सांगता येणार नाही. पण आयुक्तांनी या प्रकाराच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. - डॉ. संध्या टाकळीकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपामनपाच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. जयश्री कुलकर्णी या नुकत्याच परदेशी गेल्या आहेत. त्यांनी परदेशी जाण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या फाईलला मंजुरी दिली. आधीचे सहा महिने त्यांच्याच स्वाक्षरीने या सर्व कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ पगार मिळत गेला. मग अचानक आताच त्यांना अर्धवेळ का ठरविले गेले, याचे उत्तर मिळालेले नाही.
ड्यूटी फुलटाईम; पगार मात्र अर्धाच!
By admin | Updated: July 7, 2015 00:57 IST