भोकरदन : भोकरदन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयातील पथकाने पकडून दिलेला ट्रक पोलिसांच्या आशीर्वादामुळे गायब झाल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषी पोलिस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.जाफराबाद रस्त्यावर ट्रक (एम एच २० बी टी ४४२२) हा अवैध वाळूचा ट्रक मंगळवारी रात्री महसूलच्या पथकांनी पकडून भोकरदन पोलिस ठाण्यात जमा करून पावतीही घेतली. मात्र त्यानंतर एक तासातच हा ट्रक तेथून गायब झाला. बुधवारी ही बाब उघडकीस आल्यानंतर शोधाशोध केल्यानंतर पोलिसांना शिवना परिसरात रिकामा झालेला ट्रक सापडला. त्यातील वाळूही गायब झाली होती. याप्रकरणी भोकरदन पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरूद्ध अवैध वाळू वाहतूक तसेच ट्रक पोलिस ठाण्यातून नेऊन त्यातील वाळू गायब करून पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. मात्र तो ट्रक पोलिस ठाण्यातून पळवून लावण्यास पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्याचा हात आहे का? त्या दिवशी ट्रक सोडण्यासाठी कुणाचा फोन आला होता का? याची शहानिशा करण्यासाठी त्या दिवशी रात्री ठाण्यात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाईल रेकॉर्ड तपासण्यात यावेत. तसेच कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)
भोकरदन पोलिसांच्या मर्जीमुळेच ‘तो’ वाळूचा ट्रक झाला गायब?
By admin | Updated: February 15, 2016 00:11 IST