वसगडे : तीन महिलांनी सदोष कारवाईचा निषेध नोंदवत गांधीनगर पोलीस ठाण्यासमोरच पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत सुमारे दीड तास धिंगाणा घातल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. संपूर्ण पोलीस ठाण्याची बेअब्रू होत असताना मोठी गर्दी जमली होती. हा सर्व प्रकार करवीरचे प्रभारी उपअधीक्षक सागर पाटील यांच्यासमोरच आज, सोमवारी घडला. याची दिवसभर परिसरात जोरदार चर्चा सुरु होती.याबाबत पोलिसांतून व घटनास्थळावरुन मिळालेली अधिक माहिती अशी की, उचगाव (ता. करवीर) येथील एका मुलीची तिच्या नातेवाईक तरुणाने घरात घुसून छेड काढली. त्या तरुणाच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेऊन ती मुलगी तक्रार देण्यासाठी गांधीनगर पोलीस ठाण्यात हजर झाली. मुलीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले व त्यास फटके मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, त्या तरुणाची आई इतर दोन महिलांसह पोलीस ठाण्यात दाखल झाली. पोलीस आपल्या मुलाला मारहाण करत असल्याचे पाहून त्या महिलेने जोरजोरात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका सहायक फौजदाराने त्या महिलेच्या कानशिलात लगावली, असा आरोप करत बरोबर आलेल्या दोन महिलांनी अक्षरश: धिंगाणा घालत त्या सहायक फौजदारास अर्वाच्च शिवीगाळ केली. सुमारे दीड तास हा प्रकार सुरू होता. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. (वार्ताहर)
रुंदीकरणानंतरही कोंडी
By admin | Updated: July 22, 2014 00:50 IST