दत्ता थोरे , लातूरलातूरच्या बांधकाम विभागात झालेल्या रस्त्याच्या कामाच्या घपल्यात औसा विधानसभा मतदारसंघातील रस्त्याच्या कामातही कागदावर आधी खर्च करण्यात आला आणि मग वर्कआॅर्डर काढण्यात आल्या आहेत. तब्बल एक कोटी ८३ लाख २१ हजार रुपयांच्या कामाला डीपीसीने मंजुरी दिली होती. परंतु कामे देण्यात आणि करुन घेण्यात नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. एका दीड किलोमीटरच्या कामाचे चार-चार तुकडे पाडून कामे देण्यात आले. आ. बसवराज पाटील यांच्या मतदारसंघातील दहा कामे झाली आहेत. डीपीसीच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकूण एक कोटी ८३ लाख २१ हजार रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली होती. यात दहा कामांचा समावेश होता. या दहा कामावर एक एप्रिल २०१३ पर्यंत बांधकाम विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविण्यात आलेल्या मासिक अहवालात १ कोटी ७९ लाख ५० हजार खर्च दाखविले आहेत. तर उर्वरित ३ लाख ७१ हजार रुपये अखर्चित दाखविले आहेत. या सर्व कामांच्या वर्कआॅर्डरी या नंतरच्या आहेत. गुन्हे दाखल करण्याची मागणी... लातूरच्या बांधकाम विभागाने खर्च आणि वर्कआॅर्डर यामध्ये जो कागदी घोळ केला आहे, याची चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अॅड. संतोष गिल्डा यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली आहे. तर दुसऱ्या दिवशी या प्रकरणावर बोलायला बांधकाम विभागाकडून कुणीच तयार नव्हते, त्यामुळे त्यांची बाजू मिळू शकली नाही. असा दाखविला खर्च अन् नंतर दिल्या वर्कआॅर्डरऔसा ते आलमला हा इजिमा (इतर जिल्हा मार्ग) ११० नविन रस्ता तयार करणे हे २/५०० ते ४/०० असे दीड किलोमीटर काम होते. या कामाला एकूण ४० लाख रुपये आले. प्रत्येकी ८ लाख ७३ हजार २५६ असे या दीड किलोमीटरचे चार तुकडे पाडण्यात आले आणि गुत्तेदारांना वाटण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या मासिक अहवालात ३१ मार्च २०१३ ला यावर ३९ लाख रुपये खर्च दाखविण्यात आले आहेत तर १ लाख उर्वरित. याची वर्कआॅर्डर भाग १ ची ८ मे २०१३ ला तर भाग २,३,४ ची १४ मे २०१३ ला निघाली आहे. हसेगाव ते हसेगाव वाडी हा किलोमीटर १/६०० ते ३/१०० नवीन रस्ता तयार करणे व याची सुधारणा करणे असे काम होते. काम प्रत्यक्ष काम दीड किलोमीटरचे. याला निधी मंजूर होता ३० लाख. याचे तीन टुकडे पाडून प्रत्येकी ९ लाख ७० हजार ३६२ अशा स्वरुपात खिरापती वाटाव्यात तसे वाटण्यात आले. या कामावरही ३१ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या मासिक अहवालात खर्च दाखविण्यात आला २९ लाख ५० हजार आणि उर्वरित होते ५० हजार. प्रत्यक्षात या कामाची वर्कआॅर्डर भाग एकची १६ मे २०१३. दोन ची १६ मे २०१३ आणि तीनची १० मे २०१३ देण्यात आली आहे. आॅगस्ट २०१३ ला ७ लाख ४१ हजार ०४४ चे बिल लिहीले. त्यापोटी दोन लाख ९० हजार १६३ रुपयाचा ६९१५९५ याक्रमांकाचा चेकही दिला. जुने लामजना (पुनर्वसित) लामजना इजिमा १७ हा नवीन रस्ता तयार करण्याच्या कामचीही ही हिच स्थिती. २१/१५२ ते २१/७२८ किलोमीटरच्या या कामात प्रत्यक्ष काम ५७२ मीटर रस्ता होता. एकृण ९ लाख दहा हजार रुपये कामाची किंमत होती. यापोटी २०१२ च्या मार्चच्या मासिक अहवालात खर्च दाखविला आहे नऊ लाख रुपये ३१ मार्च २०१३ ला. उर्वरित दहा हजार रुपये पण प्रत्यक्षात कामाची वर्कआॅर्डर निघाली ती २३/४/२०१३ ला. औसा तालुक्यातील जुने लामजना पुनर्वसित इजिमा १७ हा नविन रस्ता तयार करण्याचे २०/०० ते २०/५७६ किमीपैकी प्रत्यक्षात ५७६ मीटरचे काम होते. याची किंमत नऊ लाख ११ हजार रुपये होती. मासिक अहवालात ३१ मार्च २०१३ ला खर्च नऊ लाख दहा हजार रुपये दाखवून उर्वरितमध्ये एक हजार रुपये शिल्लक ठेवले आहेत. या कामाची वर्कआॅर्डर तब्बल महिनाभराने म्हणजे २३ एप्रिल २०१३ ला देण्यात आली.
कामे देण्यात अन् करून घेण्यात नियम धाब्यावर
By admin | Updated: June 26, 2014 00:37 IST