लोकमत न्यूज नेटवर्कबीड /गेवराई : गेवराई तालुक्यातील सिरसदेवीजवळ बुधवारी पहाटे झालेल्या अपघातात ठार झालेला सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे. शेगाव येथे पोलिसांनी पकडलेल्या साखळी चोरांच्या टोळीत तो म्होरक्या होता. रोहितळमध्ये चोरी केल्यानंतर लोक मागे लागल्याच्या भीतीने ते सुसाट जात होते. याचवेळी त्यांची दुचाकी हातपंपाला धडकून अपघात झाला होता. पोलिसांच्याच गाडीने अपघात केल्याचा आरोप करून नातेवाईकांनी तब्बल २१ तास मृतदेह ताब्यात घेतला नव्हता. या अपघाताला कलाटणी मिळाल्याने खळबळ उडाली आहे.सुरेश रामड्या चव्हाण (२५, रा.परतूर जि.जालना), आकाश लक्ष्मण शिंदे (२०, गेवराई) व ज्ञानेश्वर पिसे (१७, अंतरवाली) हे तिघे मंगळवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून गेवराईहून परतूरला जात असताना अपघात झाला होता. यामध्ये सुरेश उर्फ सुरश्या हा ठार तर आकाश व ज्ञानेश्वर हे दोघे जखमी झाले होते. हे तिघेही मित्र होते. सुरेश चव्हाण हा मागील काही वर्षांपासून सासुरवाडीतच (आंतरवली ता. गेवराई) वास्तव्यास असल्याचे समोर आले आहे.दरम्यान, ज्ञानेश्वर हा मंंगळवारी दुपारी दोन वाजता तलवाडा येथे गेला होता. तेथे त्याला आकाश व सुरेश भेटले. सुरेशने या दोघांनाही पाथरी येथील मित्राला भेटायला जायचे आहे, असे सांगून दुचाकीवर बसविले. त्याप्रमाणे ते मित्राला भेटले. तेथून रात्री ९ च्या सुमारास ते परतही निघाले. रात्री १ वाजण्याच्या सुमारास ते गेवराई तालुक्यातील रोहितळजवळ आले. येथे एका शेतकऱ्याला दमदाटी करून हातातील मोबाईल हिसकावत पळ काढला. शेतकऱ्याने आरडाओरडा केला. ग्रामस्थ जमा होण्यापूर्वीच या तिघांनी दुचाकीवरून पळ काढला. जवळ कोणी आले का, हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले असता त्यांची दुचाकी हातपंपाला धडकली. यावेळी ज्ञानेश्वरने सुरेशला उठविण्याचा प्रयत्न केला. परंतु फायदा झाला नाही. आकाशला उठविले तर तो पायाला लागले आहे असे म्हणून आडवा पडला. ज्ञानेश्वर थोडा शुद्धीत असल्यामुळे तो पायी चालत जवळच असलेल्या जातेगाव येथे गेला. येथे त्याचा मित्र अमोल कारके याला झोपेतून उठवून घडला प्रकार सांगितला. अमोलच्या दुचाकीवरून ते घटनास्थळी आले. यावेळी तेथे कोणीच नव्हते. ज्ञानेश्वरने सुरेशचा अपघात झाल्याची माहिती त्याच्या सासऱ्याला दिली. त्यानंतर अमोल व ज्ञानेश्वर दुचाकीवरून गेवराई उपजिल्हा रुग्णालयात पोहचले. ते येण्यापूर्वीच सुरेशचे नातेवाईक रुग्णालयात दाखल झाले होते. सुरेशच्या दुचाकीवर ज्ञानेश्वरच होता, असे म्हणून त्याला मारहाण करण्यात आली. त्यानंतर आकाश व ज्ञानेश्वरला प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. ज्ञानेश्वरने तसा जबाब वैद्यकीय अधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी यांच्यासमोर दिला आहे.
मयत ‘सुरश्या’ साखळीचोर
By admin | Updated: July 6, 2017 23:24 IST