बीड: यंदा रबी हंगामातील घटत्या उत्पनाचा परिणाम पिकांबरोबर चाऱ्यावरही झाला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली असतानाच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मध्यंतरीच्या अवकाळीचा फायदा उचलत चारा पिकाच्या लागवाडीमध्ये सरासरीपेक्षा वाढ झाली आहे.पाण्याअभावी रब्बी हंगामातील ज्वारीच्या पिकाची पूर्ण वाढच झाली नाही. नाईलजास्तव ज्वारी बाटूक स्थितीमध्येच असताना काढणी झाली. त्याचा अप्रत्यक्ष परिणाम सध्या चाऱ्यावर झाला असल्याचे दिसत आहे. जनावरांना उन्हाळ्यात हिरवा चारा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने उन्हाळी हंगामात मका, घास, गवत आदींची लागवड केली जात होती. मात्र गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती ओढावल्याने चारा लागवडीमध्ये घटच होत आहे. त्यामुळे हिरव्या चाऱ्याला पशुधन मुकले आहे. सध्या जिल्ह्यात तीव्र चाराटंचाई निर्माण झाली आहे. ज्वारीची काढणी झाल्याबरोबरच चाऱ्याची चुणचुण भासू लागली आहे. उन्हापासून बचाव होण्याकरीता जनावरे दावणीला बांधली जातात मात्र त्यांना जगविण्यासाठी काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकीकडे जनावरांच्या चाऱ्याचे दर वाढत आहे तर दुसरीकडे दुग्धव्यवसायातून फायदा तर सोडाच मात्र होणारा खर्चही निघत नाही. कडब्याबरोबर पेंड, कळना, मक्याचा भरडा या चाऱ्यांचेही दर गगणाला भिडले आहेत. चाऱ्यासाठी अवकाळीचा आधारगेल्या वर्षभरात शेतकऱ्यांच्या पिकांवर पाणी फेरणारा अवकाळीचा उन्हाळ्यात मात्र चारा पेरणीकरिता शेतकऱ्यांनी फायदा घेतला आहे. जमिनीत पुरता ओलावा असल्याने उन्हाळी हंगामात चारापिकांच्या लागवडीत दुप्पटीने वाढ झाली आहे. यामध्ये मक्याचे अधिक प्रमाण आहे. मक्याचे ६४० हेक्टर क्षेत्र असूनही सुमारे १२६३ हेक्टरमध्ये मक्याचा पेरा झाला आहे. तर कडवळ, घास, गवत, आदी चाऱ्यांचे २ हजार हेक्टरवर लागवड केली आहे. (प्रतिनिधी)
चारा टंचाईमुळे शेतकरी दुहेरी संकटात
By admin | Updated: April 22, 2015 00:40 IST