कडा : आष्टी तालुक्यात पावसाअभावी दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा,पाणी प्रश्न गंभीर असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपले पशुधन विक्रीस काढले आहे. शेतकऱ्यांकडे चारा शिल्लक राहिला नसल्यान अहमदनगर जिल्ह्यातून चारा विकत आणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. परिणामी जे शेतकरी पशुधनावर खर्च करू शकत नाही त्यांच्यावर पशुधन विक्री करण्याची वेळ आली आहे. यामुळे कडा येथील आठवडी बाजारात पशुधन मोठ्या संख्येने विक्रीस आल्याचे दिसून आले. आष्टी तालुक्यात डोंगरदऱ्याचा परिसर मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे जनावरांचा चारा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतो. त्यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात. यामुळे तालुक्यात तब्बल तीन लाख लिटरपेक्षा अधिक दुग्धसंकलन होते. यासह तालुक्यातील अनेक मजूर उसतोडीसही जातात. त्यांच्याकडेही बैलांसह इतर पशुधन असते. शेतकऱ्यांकडे तब्बल दीड लाखांपेक्षा अधिक पशुधन आहे. दुग्धोत्पादनामुळे अनेक शेतकऱ्यांकडे आर्थिक सुबत्ताही आलेली आहे. असे असले तरी दीड महिना झाला तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. तालुक्यातील तीनशेपेक्षा अधिक वाडी-वस्त्यांवर सध्या पिण्याचे पाणी मिळणेही दुर्लभ झाले आहे. परिणामी येथे दोनशेपेक्षा अधिक टॅँकर सुरू आहेत. पिण्याच्या पाण्याचेच दुर्भिक्ष असल्याने जनावरांसाठी कोठून पाणी आणणार असाही प्रश्न आहे. पाणीटंचाईमुळे हिरवा चाराही शेतकऱ्यांकडे नाही. परिणामी उसाची मोळी ५० ते ६० रुपयांना विक्री होऊ लागली आहे. चारा महागल्याने पशुधनाचा खर्च वाढला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आपले पशुधन कडा येथील जनावरांच्या आठवडी बाजारात विक्रीसाठी आणल्याचे चित्र दिसून आले. यामुळेही पशुधनाचे दरही उतरले आहेत. ९० हजारांना मिळणारी बैलजोडी ६० हजारांना मिळू लागली आहे. तर, ६० हजारांची गाय ४० हजारांना, ७० हजारांची म्हैस ५५ हजारांना विक्री होऊ लागल्याचे शेतकरी बाबासाहेब तळेकर यांनी सांगितले. काही शेतकरी नगर जिल्ह्यातून चारा आणत असल्याचे आदीनाथ करडुळे, मारोती औटे, माणिक तळेकर यांनी सांगितले. पशुधनासाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणीही होत आहे. तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक राठोड म्हणाले, चाराटंचाईमुळे शेतकरी अडचणीत आले असल्याने पशुधनाची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)
टंचाईमुळे बाजारात गुरांची बेभाव विक्री
By admin | Updated: July 22, 2014 00:14 IST