राजेश खराडे , बीडपरिमंडळात सर्वाधिक थकबाकी बीड मंडळाकडे आहे. दुष्काळी परिस्थितीचे निमित्त करून ग्रामीण भागातील वसुलीला ब्रेक बसला आहे तर प्रशासकीय कार्यालयांच्या उदासिनतेमुळे एकूण थकबाकीचा जवळपास निम्मा भार प्रशासकीय कार्यालयांनी उचलला आहे.जिल्ह्यातील नगरपालिका व पाणीपुरवठा विभागाकडे ३३०७ कनेक्शनच्या बदल्यात महावितरणची तब्बल १४५ कोटी ५८ लाख २२ हजार ऐवढी थकबाकी आहे. मार्च महिन्यात महावितरणकडून विशेष वसुली मोहीम राबविण्यात आली होती. यामध्ये दुष्काळी परिस्थिती असतानाही ग्रामीण भागातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे महावितरण ठरवून दिलेल्या उद्दिष्टाच्या जवळपास पोहचले होते. मात्र ग्रामीण भागातूनही वसुली होत असताना पाणीपुरवठा विभाग व नगरपालिकेच्या पथदिव्यांकडील वसुलीकडे महावितरणचे दुर्लक्ष झाले आहे. या दोन्ही विभागाची अधिक थकबाकी असूनही महावितरणकडून केवळ नोटीसाशिवाय अन्य कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. वसुली मोहिमेदरम्यान घरगुती, व्यापारी, औद्योगिक वर्गाकडून सरासरीइतकी वसुली झाली आहे. असे असतानाही गेल्या महिनाभरापासून विद्युत पुरवठा दुरूस्ती कामामुळे विस्कळीत झाला आहे. एकीकडे वीज बिलांचा भरणा करूनही ग्राहकांना सुरळीत सेवा भेटत नाही तर दुसरकीडे प्रशासकिय कार्यालयांकडून ‘पुढचे पाठ अन् मागचे सपाट’ असे सुरू आहे. केवळ चालू बिले भरली जात आहेत. त्यांना सेवा मात्र अखंडीत आहे. बीड नगरपालिकेला महिन्याकाठी ७ ते ८ लाख रुपयांचे बिल येते तर थकबाकी १२० कोटींच्या घरात आहे. नगरपालिकेकडून केवळ महिन्याचे बिल अदा केले जात आहे. १२० कोटींच्या थकबाकीकडे महावितरणचेही दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे बीड नगरपालिकेकडे सर्वाधिक १६ कोटी ४० लाखाची थकबाकी आहे.शहरातील पथदिव्यांची संख्या २२६ एवढीच आहे. शहरातील शाहू नगर, अंबिका चौक, स्वराज्यनगर, पंचशीलनगर आदी भागातील पथदिव्यांचे डायरेक्ट कनेक्शन करण्यात आल्यानेच दिवसाही पथदिवे हे सुरूच राहत आहे.महावितरणकडून विद्युत खांबावरील टायमर स्वीच खराब असल्याचा बोलबाला केला जात आहे. पथदिवे वापरत असलेल्या विजेचे मुल्य सामान्यांच्या बीलात समावेश केले जाते. अशा प्रकारे सर्वसामान्यांच्या खिशातूनच महावितरण वसुली करीत आहे. नगरपालिकेचे पथदिवे आणि पाणीपुरवठा विभागातून सर्वसामान्य नागरिकांना होणारा पाणीपुरवठा हे दोन्हीही विभाग प्रत्यक्ष जनतेशी जोडले गेले आहेत. विद्युत पुरवठा खंडीत केल्यास सर्वसामान्य नागरिकांची अडचण होणार आहे. नगर पालिकेला वेळोवेळी थकबाकीसंदर्भात नोटिसा दिल्या असल्याचे जिल्हा अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले.
थकबाकीत प्रशासकीय कार्यालयांचाही वाटा
By admin | Updated: May 12, 2015 00:52 IST