राजकुमार जोंधळे , लातूरसध्याच्या भयावह आणि जिवघेण्या दुष्काळावर केवळ चर्चा करीत बसण्यापेक्षा त्यावर कशी मात करता येईल? यावर संशोधनवृत्तीतून सेंद्रीय शेतीचा प्रयोग यशस्वी करीत लातूर तालुक्यातील सेलू जवळगा येथील एका तरुण शेतकऱ्याने दुष्काळावर मात केली आहे. रबी हंगामातील जोंधळा, हरभरा, करडई आदी पिकांनी त्यांचा मळा फुलला आहे.सेलू जवळगा येथील तरुण शेतकरी अभिजीत चौंडा यांना २२ एकर जमीन आहे. रासायनिक खताचा वापर करून आतापर्यंत त्यांनी शेती केली. परंतु, खर्चाइतकेही उत्पन्न निघेना. रासायनिक खताच्या माऱ्यामुळे जमिनीचा पोतही घसरला. कृषी विभागातील तज्ज्ञांकडून त्यांनी मार्गदर्शन घेतले. रासायनिक खताच्या बेसुमार वापरामुळे जमिनीचा पोत आणि उत्पादनात घट हे लक्षात आल्याने त्यांनी सेंद्रीय शेतीचा प्रयोग हाती घेतला आणि यंदाचा रबी हंगाम धोक्यात असताना करडई, मोठी ज्वारी, हरभरा आदी पिकांची पेरणी केली. पाणीही कमी लागले. सेंद्रीय खतामुळे पीक बहरून आले आहे. ज्वारी फुलोऱ्यात असून, हरभऱ्याला घाटे लागले आहेत. मागचा अनुभव पाहता उत्पादनात मोठी वाढ होणार हे आता निश्चित आहे. केवळ सेंद्रीय खत आणि आहे त्या पाण्याचा योग्य वापर यामुळे दुष्काळातही त्यांची शेती हिरवीगार झाली आहे. २२ एकरपैकी २० एकरामध्ये करडई, हरभरा आणि जोंधळा हे पीक बहरात आले आहे.
सेंद्रीय शेतीतून केली दुष्काळावर मात !
By admin | Updated: December 20, 2015 23:51 IST