जालना : बहुचर्चित ड्रायपोर्ट प्रकल्पाचे आणि जालना - भोकरदन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी म्हणजेच २५ डिसेंबर रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे की, जालना शहरापासून जवळच असलेल्या दरेगाव शिवारात जवाहरलाल नेहरू पोर्टमार्फत होत असलेला ड्रायपोर्ट व जालना- भोकरदन रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.भूसंपादनाच्या अडथळ्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकल्पाचे भूमिपूजन रखडले होते. आता ड्रायपोर्टनिर्मितीसाठी आवश्यक असणारी सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पामुळे जालना औद्योगिक वसातीतील उद्योगांना चालना मिळण्यासोबतच रोजगारीची संधीही उपलब्ध होणार आहे. या बरोबरच जालना ते भोकरदन रस्त्याच्या कामाचेही याच दिवशी भूमिपूजन करण्यात येणार आहे. या रस्त्यासाठी ६७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राजूर भक्तंसाठी हा मार्ग खडतर ठरत होता. आता लवकरच या रस्त्याच्या कामास प्रारंभ होणार असल्याने गणेशभक्तांची गैरसोय दूर होणार आहे. (प्रतिनिधी)
ड्रायपोर्टचे भूमिपूजन २५ डिसेंबरला
By admin | Updated: December 3, 2015 00:30 IST